भाकरीबरोबर तवा देखील करपल्याची भावना म्हणून... : राजू शेट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 08:02 PM2018-06-20T20:02:06+5:302018-06-20T20:02:06+5:30
लोकसभा निवडणुकीत भाकरी फिरवायची म्हणून युतीला साथ दिली. त्यानंतर सत्तांतर देखील झाले. मात्र भाकरी फिरविता फिरविता आमचा तवा देखील करपून गेला.
पुणे : मागील लोकसभा निवडणुकीनंतर आलेल्या अनुभवामुळे भाकरीबरोबर तवा देखील करपल्याची भावना आहे. त्यामुळे सध्या सर्वच पक्षांपासून समान अंतर राखून आहे. अद्याप निवडणुकीबाबत कोणतीही भूमिका ठरली नसल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले.
शेतकरी आंदोलन आणि शेतकरी प्रश्नांबाबत शेट्टी यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीबाबत भाष्य केले. गेल्या लोकसभा निवडणुकीत आघाडी सरकारवर निष्प्रभतेचा आरोप करुन स्वाभिमानीने युतीचा हात पडकला होता. मात्र, मतभेद झाल्यानंतर शेट्टी युतीतून बाहेर पडले.
सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युती आणि आघाडीची चर्चा सुरु असल्याचे विचारले असता शेट्टी म्हणाले, गेल्या लोकसभा निवडणुकीत भाकरी फिरवायची म्हणून युतीला साथ दिली. त्यानंतर सत्तांतर देखील झाले. मात्र भाकरी फिरविता फिरविता आमचा तवा देखील करपून गेला. त्यामुळे या वेळी अधिव सावध आहोत. सध्या सर्वच पक्षांपासून समान अंतरावर आहे. निवडणुकीत कोणत्या पक्षाबरोबर जायचे याचा निर्णय अद्याप झालेला नाही. मात्र, लोकसभेत असलेले हमी भाव विधेयक आणि शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती याला जो पक्ष पाठिंबा देईल आणि सत्ताबदल झाल्यावर प्रलंबित विधेयकाची अंमलबजावणी करण्याची खात्री देईल त्यांच्या समवेत जाऊ असे शेट्टी म्हणाले.