गर्भधारणेच्या सुरुवातीला तीव्र कळा जाणवताहेत? स्त्रीरोगतज्ज्ञांच्या संपर्कात रहा : मूत्रमार्गाचा संसर्ग किंवा डिहायड्रेशनही असू शकते कारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:16 AM2021-08-20T04:16:29+5:302021-08-20T04:16:29+5:30
स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. राजेश्वरी पवार म्हणाल्या, ‘गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळात पोटात कळ येणे, ओटीपोटात दुखणे किंवा स्नायूंवर ताण आल्यासारखे वाटू शकते. ...
स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. राजेश्वरी पवार म्हणाल्या, ‘गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळात पोटात कळ येणे, ओटीपोटात दुखणे किंवा स्नायूंवर ताण आल्यासारखे वाटू शकते. जेव्हा तुम्ही हालचाल करता, शिंकता किंवा खोकता, तेव्हा पोटात वेदना झाल्याचे जाणवू शकते. या वेदना सौम्य प्रकारच्या असतील आणि त्याव्यतिरिक्त इतर कोणती लक्षणे नसतील तर कदाचित चिंतेचे कारण नाही. परंतु, पोटात तीव्र कळ येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करण्याऐवजी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. बसण्याची, झोपण्याची स्थिती बदलण्याचा प्रयत्न करा, गरम पाण्याने आंघोळ करा. पुरेशी विश्रांती तसेच व्यायाम करायला विसरू दुखणा-या भागावर गरम पाण्यात बुडवलेला टॉवेल किंवा गरम पाण्याची पिशवी ठेवा. हायड्रेटेड राहण्यासाठी पुरेसे द्रव पदार्थांचे सेवन करा.’
गर्भधारणेनंतर एक किंवा दोन आठवडे पोटात कळ येऊ शकतात. एखाद्याच्या फॅलोपियन ट्यूूबमध्ये अंडी फलित झाल्यानंतर ते गर्भाशयात प्रवेश करते. यादरम्यान सुरुवातीच्या काळात थोडेसे क्रॅम्पिंग होऊ शकते. पहिल्या तिमाहीत आपल्या शरीरात वेगाने बदलत होतात. गर्भाची वाढ होताना गर्भाशयावर ताण आल्यास पोटात कळ येऊ शकते, गर्भधारणेदरम्यान झालेल्या डिहायड्रेशनमुळेदेखील क्रॅम्पिंग होऊ शकते. गर्भवती महिला खूप लवकर डिहायड्रेट होऊ शकतात. ओटीपोटात दुखणे देखील क्रॅम्पिंगला आमंत्रित करू शकते. गॅस, सूज येणे, बद्धकोष्ठता आणि इतर पचन समस्यांमुळे देखील पोटात कळ येऊ शकते.
-------------------
गंभीर कारणे कोणती?
- एक्टोपिक गर्भधारणा तेव्हा होते जेव्हा अंडी फॅलोपियन ट्यूबमध्ये किंवा इतरत्र प्रत्यारोपित होते. अशावेळी गर्भाशयाचे अस्तर वेदनेस कारणीभूत ठरत नाही. यामुळे क्रॅम्पिंगचा धोका वाढू शकतो.
- गर्भपात झाल्यामुळे देखील पोटात कळ येऊ शकते. सहसा, गर्भपात झाल्यास पोटात कळ येण्याबरोबरच रक्तस्राव देखील होऊ शकतो.
- मूत्रमार्गाचा संसर्ग (यूटीआय) हे देखील पोटात कळ येण्याचे कारण असू शकते.