काेराेनात पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे शुल्क माफ, पुणे विद्यापीठाचे परिपत्रक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2022 08:49 AM2022-07-11T08:49:57+5:302022-07-11T08:51:03+5:30
या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची सर्व महाविद्यालयांना निर्देश...
पुणे : काेराेनात आई-वडील किंवा पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ चे शुल्क माफ करावे, असे परिपत्रक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने काढले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी सर्व महाविद्यालयांनी करावी, असेही त्यात म्हटले आहे.
याआधी शुल्क माफ करण्याबाबत परिपत्रक काढूनही बहुतांशी महाविद्यालयांनी या विद्यार्थ्यांचे शुल्क माफ केले नव्हते. याबाबत स्टुडंट हेल्पिंग हँडस् संघटनेने विद्यापीठाला तक्रार केली हाेती, तसेच दाेनशे पात्र विद्यार्थ्यांची माहिती सादर केली हाेती. या तक्रारीची दखल घेत प्र-कुलगुरू डाॅ. संजीव सोनवणी यांनी हे परिपत्रक काढले, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष कुलदीप आंबेकर यांनी दिली.
काेरोनामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क माफ करण्याबरोबरच त्यांचे पालकत्व समाजातील दानशूर संस्था, व्यक्तींनी स्वीकारावे, असे आवाहन संघटनेच्या वतीने केले. पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांच्या फी माफीची अंमलबजावणी न करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करावी, असे म्हटले आहे.