पायांनी घडवतोय ‘तो’ आपले भविष्य!
By admin | Published: February 23, 2016 03:21 AM2016-02-23T03:21:28+5:302016-02-23T03:21:28+5:30
अभ्यासाचा ताण, पेपरची भीती, कुटुंबीयांचा दबाव अशी एक ना अनेक कारणांनी आयुष्यातच हतबल होऊन आत्महत्येचा मार्ग स्वीकारणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्यातीलच एक विद्यार्थी अनोखी
पुणे : अभ्यासाचा ताण, पेपरची भीती, कुटुंबीयांचा दबाव अशी एक ना अनेक कारणांनी आयुष्यातच हतबल होऊन आत्महत्येचा मार्ग स्वीकारणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्यातीलच एक विद्यार्थी अनोखी ‘पाय’वाट दाखवत आहे. अवघा ११ वर्षांचा असताना, शिवजयंतीच्या मिरवणुकीच्या तयारीत त्याचे दोन्ही हात गेले; पण त्याची दुर्दम्य इच्छाशक्ती ‘अपंग’ होण्यापासून परावृत्त करत गेली आणि आज हा विद्यार्थी बारावीचे पेपर चक्क पायाने सोडवत आहे.
साहिल शेख असे त्याचे नाव आहे. अपंगत्व असणाऱ्या विद्यार्थ्याला परीक्षेचे पेपर सोडविण्यासाठी लेखनिक घेण्याची मुभा असते. मात्र, आपले शारीरिक अपंगत्वच नव्हे, तर दुसऱ्यावर अवलंबून राहण्याचे पंगुत्व ही साहिलने त्याच्या आत्मविश्वास व इच्छाशक्तीने हाणून पाडले आहे. साहिल हा सध्या पुण्यातील पूना कॉलेज येथील केंद्रावर कॉमर्स शाखेचे पेपर देत आहे.
वडगाव शेरी येथे राहणारा साहिल हा जन्मत:च अपंग नाही. तो अगदी सर्वसामान्यपणे आयुष्य जगत होता. इयत्ता सहावीपर्यंत त्यानेही हातानीच पेपर सोडवले होते. मात्र, २००८ मध्ये त्याच्यावर हात गमाविण्याचा प्रसंग ओढावला याविषयी साहिल सांगतो, शाळेत इयत्ता सहावीत असताना, शिवजयंतीचा कार्यक्रम ठरविण्यात आला. यासाठी मिरवूणक काढण्यात येणार होती. त्या वेळी मी ध्वज नाचविण्याचा खेळ खेळणार होतो. त्याच्या सरावासाठी तो घराच्या टेरेसवर गेला. काठी न मिळाल्याने तो स्टिलचा एका बार उंचावून खेळत होता. तो बार नेमका उच्च दाबाच्या वीजवाहिनीवर पडला आणि जोराचा विजेचा धक्का लागून जागीच कोसळला. यानंतर साहिलवर दोन-तीन महिने रुग्णालयात उपचार झाले. मात्र, डॉक्टरांनी त्याचे हात कापून टाकण्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले आणि त्याला हात गमवावे लागले. यानंतर वर्षभर तो घरीच होता. या दरम्यान त्यांनी परिसरातील एका क्लासमध्ये त्याला दाखल केले. तेथील शिक्षकाने त्याला पायाने लिहिण्याचा सराव करशील का, असे विचारले. प्रतिकूल परिस्थितीत जगण्याची नवी उमेद शोधावी, या विचारानेच तो पायाने लिहिण्याचा सराव करू लागला. त्यात त्याला गती प्राप्त झाली. दिवसा वाचन आणि पायाने लेखनाचा सराव, असा त्याचा दिनक्रम सुरू झाला. साहिलने दहावीची बहि:स्थ परीक्षा दिली होती. पायाने पेपर सोडवत त्याने ५५ टक्के गुण प्राप्त केले होते. (वार्ताहर)
साहिलला सीए व्हायचंय...
साहिलला आपली शैक्षणिक घोडदौड अशीच सुरू ठेवायची आहे. त्याला सी.ए. व्हायचं आहे. त्याने दहावीनंतर एम.एच.सीआयटी व इतर संगणकाचा अभ्यासही पूर्ण केला आहे. या सगळ्यांमध्ये त्याला घरातून मदत मिळते मात्र विशेष करून त्याचे आजोबा अजिज शेख हे त्याला क्लासमध्ये नेणे-आणणे यासह सतत प्रोत्साहन देत असल्याचेही साहिल सांगण्यास विसरत नाही..!!