कोरोनाने दोन मुले हिरावलेल्या माळीकाकांच्या मदतीला ‘फेलिसिटा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:08 AM2021-06-11T04:08:46+5:302021-06-11T04:08:46+5:30
पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांना जीव गमवावा लागला आहे. अनेक मुले अनाथ झाली. तर अनेक मातापिता बेवारस झाले. ...
पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांना जीव गमवावा लागला आहे. अनेक मुले अनाथ झाली. तर अनेक मातापिता बेवारस झाले. पुण्यातील बाणेर-पाषाण लिंक मार्गावरील फेलिसिटा सोसायटीत माळीकाम करणाऱ्या ७० वर्षीय किशन सिंग यांच्यावर असाच दुर्धर प्रसंग ओढवला. त्यांची दोन कर्ती मुले कोरोनाने ओढून नेली आणि म्हातारपणात निराधार होण्याची वेळ त्यांच्यावर आली. या अवघड स्थितीत किशन सिंग यांच्या मदतीला माळी पूर्ण सोसायटी धावून आली. सोसायटीच्या सदस्यांनी वर्गणी काढून त्यांना दोन लाखांची आर्थिक मदत केली.
किशन सिंग हे ७० वर्षांचे असून ते सोमेश्वरवाडी येथे राहतात. ते मूळचे उत्तर प्रदेशातील अयोध्येचे. पोटासाठी काही वर्षांपूर्वी सिंग पत्नी, मुलांसह पुण्यात आले. त्यांची दोन मुले ब्रिजमोहन आणि गोपाळ (नावे बदलली आहेत) पुण्यातच काम करत होती. थोरला ब्रिजमोहन पत्नी आणि चार मुलांसोबत किशन सिंग यांच्यासोबत राहत असे. त्याचे बाणेर-पाषाण लिंक रस्त्यावर पानाचे दुकान होते. तर दुसरा मुलगा गोपाळ एका बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात कामाला होता. जुलै महिन्यात गोपाळचे लग्न होणार होते.
एप्रिल-मे मध्ये देशासाहित पुण्यातही कोरोनाची दुसरी लाट आली. यातच किशन सिंग यांच्या दोन्ही मुलांना कोरोनाची लागण झाली. ब्रिजमोहन ४२ तर गोपाळ ३२ वर्षांचा होता. त्यांना त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल केले. मात्र अखेरीस दोघांचाही मृत्यू झाला. किशन सिंग यांना या संकटाशी कसा सामना करायचा, असा प्रश्न पडला. अनेक दिवस किशन सिंग फेलिसिटा सोसायटीत कामाला जाऊ शकले नाहीत. तेव्हा सोसायटीच्या अध्यक्षांनी त्यांच्याशी संपर्क साधला तेव्हा त्यांना किशन सिंग यांच्यावर गुदरलेला प्रसंग समजला.
चौकट
व्यक्तिगत प्रसिद्धी नको
सोसायटीच्या व्हाॅट्सअॅप ग्रुपवर किशन सिंग यांच्यावरील संकटाची माहिती देण्यात आली. सोसायटीत १२० कुटुंबे वास्तव्यास आहेत. त्यातल्या ६० ते ७० सदस्यांनी संवेदनशीलता दाखवात आर्थिक मदतीचे आश्वासन दिले. यातून आत्तापर्यंत दोन लाख रुपये जमा झाले. ते धनादेशाच्या स्वरूपात वृद्ध किशन सिंग यांना देणार असल्याचे सोसायटी सदस्यांनी सांगितले. सोसायटीतल्या सदस्यांनी व्यक्तिगत नावांना प्रसिद्धी न देण्याची विनंती केली. त्यामुळे ‘लोकमत’ प्रतिनिधीने त्यांची नावे दिलेली नाहीत.