कोरोनामुळे दोन मुले हिरावलेल्या माळी काकांच्या मदतीला धावली 'फेलीसीटा'! केली २ लाखांची आर्थिक मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 03:51 PM2021-06-10T15:51:43+5:302021-06-10T17:41:39+5:30
कोरोनामुळे आपल्या दोन मुलांचा जीव गमावलेल्या माळी काकांना सोसायटीने दिला मदतीचा हात
पुणे: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांना जीव गमवावा लागला आहे. अनेक आई वडिलांची मुले अनाथ झाली. तर काहींच्या मुलांना आपले आई वडील कायमचे सोडून गेले आहेत. दुसऱ्या लाटेत जवळच्या माणसाला शेवटचे पाहताही आले नाही. असे प्रसंग सर्वसामान्य माणसावर ओढवले आहेत. अशीच एक घटना पुण्यातील बाणेर पाषाण लिंक रोडवर असणाऱ्या फेलीसीटा सोसायटीच्या माळी काकांबाबत घडली आहे. माळी काकांनी कोरोनामुळे आपल्या दोन मुलांना गमावले आहे. अशा परिस्थितीत निराधार झालेल्या माळी काकांच्या मदतीला पूर्ण सोसायटीच धावून आली आहे. सर्वांनी मिळून त्यांना दोन लाखांची आर्थिक मदत केली असल्याचे सोसायटीच्य अध्यक्षांनी लोकमतला सांगितले.
किशन सिंग असे फेलीसीटा सोसायटीत काम करणाऱ्या माळी काकांचे नाव आहे. सिंग हे ७० वर्षांचे असून ते सद्यस्थितीत सोमेश्वर वाडी येथे वास्तव्यास आहेत. उत्तर प्रदेशातील अयोध्या हे त्यांचे मूळ गाव आहे. काही वर्षांपूर्वी सिंग आपली पत्नी, मुले यांच्यासमवेत पुण्यात कामासाठी आले. आपल्या कुटुंबाबरोबर ते सुखाने नांदत होते. त्यांची दोन मुले ब्रिजमोहन आणि गोपाळ ( नावे बदलली आहेत ) पुण्यातच काम करत होती. ब्रिजमोहन हा वयाने मोठा होता. एक पत्नी आणि चार मुलांसोबत तो सिंग यांच्याबरोबर राहत असे. त्याचे बाणेर पाषाण लिंक रस्त्यावर पानाचे दुकान होते. तर दुसरा मुलगा गोपाळ बिल्डरच्या ऑफिसमध्ये कामाला होता. त्याचे जुलै महिन्यात लग्न ठरले होते.
मागच्या महिन्यात देशासाहित पुण्यातही कोरोनाची दुसरी लाट आली होती. शहरात रुग्णसंख्येने तर एका दिवसात ३,४ हजार कोरोनाबाधित आढळण्याचा टप्पाही ओलांडला होता. अशा वेळी सिंग यांच्या दोन्ही मुलांना कोरोनाची लागण झाली. ब्रिजमोहनचे वय ४२ तर गोपाळचे ३२ होते. त्यांना त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र अखेर शरीराने साथ दिली नाही. कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाला. ब्रिजमोहनचे लग्न झाले होते. त्याला लहान चार मुलं आहेत. तर जुलै महिन्यात गोपाळचे लग्न ठरले होते. माळी काकांना या संकटाशी कसा सामना करावा हा प्रश्न पडला होता. निराधार झालेल्या माळी काकांवर कुटुंबाची सर्वच जबाबदारी आली होती.
सोसायटीत बरेच दिवस काका कामाला आले नाहीत. म्हणून सोसायटी अध्यक्षांनी काकांशी संपर्क साधला. त्याच क्षणी काकांनी घडलेली सर्व घटना त्यांना सांगितली. माळी काकांना मदत करण्याच्या हेतूने त्यांनी सोसायटीच्या व्हाट्स अँप ग्रुपवर काकांच्या घटनेची सर्व माहिती दिली. सोसायटीत १२० कुटुंब वास्तव्यास आहेत. त्यापैकी ६० ते ७० सदस्यांनी त्यांच्या मेसेजला सकारात्मक प्रतिसाद देत आर्थिक मदतीचे आश्वासन दिले. आणि सर्वांनी प्रत्येकी २, ३, ५, आणि १० हजार देऊन मदत करण्याचे ठरवले.
"सोसायटीतील अनेकांनी माळी काकांसाठी आर्थिक मदत केली आहे. आतापर्यंत २ लाख रुपये जमा झाले आहेत. आज सायंकाळी ते आम्ही चेकच्या स्वरूपात सिंग यांच्या स्वाधीन करणार आहोत. असे त्यांनी सांगितले आहे."