‘सारथी’तील २४१ पीएच.डी संशोधकांना लवकरच फेलोशिप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:11 AM2021-05-25T04:11:26+5:302021-05-25T04:11:26+5:30
पुणे : सारथी संस्थेत गेल्या एक-दीड वर्षापासून २४१ विद्यार्थ्यांना पीएच.डी साठीची फेलोशिप मिळाली नाही. परंतु, येत्या १ जूनला सारथीच्या ...
पुणे : सारथी संस्थेत गेल्या एक-दीड वर्षापासून २४१ विद्यार्थ्यांना पीएच.डी साठीची फेलोशिप मिळाली नाही. परंतु, येत्या १ जूनला सारथीच्या सर्व संचालकांची बैठक घेऊन या विद्यार्थ्यांचे गुणांकन तपासून फेलोशिप सुरू करणार असल्याचे सारथीच्या संचालकांनी सांगितले अशी माहिती शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी दिली.
मेटे यांनी सोमवारी (दि. २४) ‘सारथी’ला भेट देत संचालकांशी चर्चा केली. शिवसंग्रामचे पुण्याचे प्रमुख तुषार काकडे आदी यावेळी उपस्थित होते. त्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. “विद्यार्थ्यांच्या रखडलेल्या विविध प्रश्नांसाठी येत्या १ जूनला सारथीच्या संचालक मंडळाची बैठक होणार आहे. तेव्हा विद्यार्थ्यांचे गुणांकन तपासून फेलोशिप सुरू करण्याचा निर्णय होणार आहे. तसेच, दोन वर्षांत पीएच.डी पूर्ण करणे विद्यार्थ्यांना बंधनकारक होणार आहे,” असे मेटे म्हणाले.
चौकट
‘सारथी’त अपुरे मनुष्यबळ
सारथी संस्थेत सध्या ४-५ कर्मचारी आहेत. पुढील दोन महिन्यांत ४० अधिकारी-कर्मचारी भरणार आहेत. त्यामुळे मनुष्यबळाअभावी रखडलेली विद्यार्थ्यांची सारथीतील कामे लवकरच मार्गी लागतील असा दावा मेटे यांनी केला. तसेच, सध्या सारथीचे काम भाड्याच्या जागेत सुरू आहे. लवकरच नव्या जागेत ही संस्था काम सुरू करेल. या जागेचा आराखडा केला जाणार असल्याचे मेटे म्हणाले.