पाबळला पाण्यासाठी महिला आक्रमक
By admin | Published: March 22, 2017 02:59 AM2017-03-22T02:59:59+5:302017-03-22T02:59:59+5:30
येथील गावठाणातील नळपाणी पुरवठा बंद असल्याने येथील महिलांनी पाबळ ग्रामपंचायतीवर मोर्चा नेला. या वेळी महिलांनी ग्रामविकास
पाबळ : (ता. शिरूर) येथील गावठाणातील नळपाणी पुरवठा बंद असल्याने येथील महिलांनी पाबळ ग्रामपंचायतीवर मोर्चा नेला. या वेळी महिलांनी ग्रामविकास अधिकाऱ्यांना धारेवर धरून तातडीने पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी-निवेदन देऊन केली असून दोन-तीन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही, तर हंडा मोर्चा काढून ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्याचा इशारा दिला.
या वेळी पाबळच्या सरपंच मनीषा बगाटे, ग्रामपंचायत सदस्य पल्लवी डहाळे, अमोल जाधव, संजच चौधरी, नामदेव जगताप, ग्रामविकास अधिकारी बी. बी. गोरे व ग्रामस्थ उपस्थित होते. येत्या दोन ते तीन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन या वेळी ग्रामसेवक गोरे यांनी दिले.
संतप्त महिलांनी प्रशासनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. त्याचबरोबर नळपट्टी व कर वसुली देऊनसुद्धा नेमके गावठाणाला पाणी का देत नाही, असा प्रश्न उपस्थित केला. या वेळी ग्रामपंचायत सदस्य नामदेव जगताप व त्यांच्या सहकाऱ्यांनी येत्या काळात पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही, तर सामूहिक सदस्यपदाचा राजीनामा देणार असल्याचे सांगितले.
शिरूरच्या दुष्काळी पट्ट्यातील पाबळ गावाला थिटेवाडीचे वरदान लाभले. या ठिकाणी गावठाणासाठी विहीर घेऊन पाणी योजना राबविण्यात आली आहे. काहीसे पाणी असताना १० दिवसांपूर्वी ग्रामपंचायतीने वीजबिल थकवल्याने येथील विद्युत जोड तोडण्यात आले. सुमारे १८ लाख रुपये थकीत बिल असल्याने विहिरीवरील वीजजोड तोडण्यात आले.
सुमारे ४ ते ५ हजार लोकसंख्या असणाऱ्या गावठाणात सध्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून घरोघरी जाऊन टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, अनेक नागरिकांनी पाणी मिळविण्यासाठी धावपळ करावी लागत असून, पाणी मिळवताना महिलांची भांडणे होत आहे. तर, अनेकांनी स्वतंत्र पैसे देऊन खासगी टँकरद्वारे पाणी घेणे पसंत केले असून, आठवड्याला १००० ते २००० रुपयांचा आर्थिक फटका अनेक नागरिकांना बसला आहे. येथील नळपाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे. (वार्ताहर)