बिल मंजुरीसाठी लाच घेणारी महिला लिपिक पोलिसांच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:16 AM2021-08-18T04:16:52+5:302021-08-18T04:16:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : आपल्या विभागातील कर्मचाऱ्याचे बिल मंजूर करण्यासाठी टक्केवारीप्रमाणे मोबदला म्हणून लाच घेणाऱ्या लिपिक महिलेला लाचलुचपत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : आपल्या विभागातील कर्मचाऱ्याचे बिल मंजूर करण्यासाठी टक्केवारीप्रमाणे मोबदला म्हणून लाच घेणाऱ्या लिपिक महिलेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले.
सीमा विद्याधर विपट (वय ४७) असे या कनिष्ठ लिपिकाचे नाव आहे. विपट या जिल्हा परिषद अंतर्गत एकात्मिक बालविकास योजना प्रकल्पात मुळशी तालुक्यातील पौड येथे कार्यरत आहेत.
तक्रारदार हे त्यांच्याच विभागात कर्मचारी आहेत. त्यांचा प्रवास भत्ता बिल मंजूर केल्याचा मोबदला म्हणून विपट यांनी तक्रारदार त्यांच्याकडे ३ हजार ४५० रुपयांची लाच मागितली. या कर्मचाऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पडताळणी केल्यावर विपट यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पौड येथील कार्यालयात सापळा रचण्यात आला. ३ हजार ४५० रुपयांची लाच स्वीकारताना सीमा विपट यांना पकडण्यात आले.
भ्रष्टाचार प्रतिबंध अभिनियमानुसार पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक सुनील क्षीरसागर तपास करीत आहेत.