महिला वाहकांना मिळणार नऊ महिन्यांची प्रसूती रजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 12:57 PM2018-03-26T12:57:32+5:302018-03-26T12:57:32+5:30
महिला वाहक कर्मचाºयांना दोन हयात अपत्यांपर्यंत १८० दिवसांच्या प्रसूती रजेसह ३ महिन्यांची अतिरिक्त रजा घेता येणार आहे. एक वर्षापेक्षा कमी सेवा झालेल्या महिला वाहकांनाही याचा लाभ होणार आहे.
पुणे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळा (एसटी) तील महिला वाहक कर्मचाऱ्यांना आता नऊ महिन्यांची प्रसूती रजा मिळणार आहे. तसेच सरासरी वेतनावरील रजा वैद्यकीय प्रमाणपत्र सादर न करताही घेता येणार आहे. वाहक वगळता इतर महिला कर्मचाऱ्यांना मात्र पूर्वीप्रमाणेच सहा महिन्यांची प्रसूती रजा मिळेल.
एसटी प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी दि. १२ जानेवारीपासून होणार आहे. याबाबत प्रशासनाकडून परिपत्रक काढण्यात आले आहे. एसटीतील महिला कर्मचाऱ्यांना २४ नोव्हेंबर २०१० च्या परिपत्रकानुसार १८० दिवस खास प्रसूती रजा मंजूर केली जाते. या परिपरत्रकातील तरतुदींमध्ये आता सुधारणा करण्यात आली असून केवळ महिला वाहक कर्मचाऱ्यांसाठीच्या प्रसूती रजेचा कालावधी वाढविण्यात आला आहे. याबाबतचा ठराव १२ जानेवारी रोजीच झाला होता. त्याबाबतचे परिपत्रक २३ मार्च रोजी काढण्यात आले आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी ठरावाच्या दिवसापासूनच होणार आहे.
सुधारित परिपत्रकानुसार, महिला वाहक कर्मचाऱ्यांना दोन हयात अपत्यांपर्यंत १८० दिवसांच्या प्रसूती रजेसह ३ महिन्यांची अतिरिक्त रजा घेता येणार आहे. एक वर्षापेक्षा कमी सेवा झालेल्या महिला वाहकांनाही याचा लाभ होणार आहे. प्रसूती रजा संपल्यानंतर आवश्यकता असल्यास महिला वाहकांच्या खाती जमा असणारी सरासरी वेतनावरील रजा वैद्यकीय प्रमाणपत्र सादर न करता घेता येईल.
कालावधी ठरविण्याचा अधिकार
या रजेपैकी किती व कोणत्या कालावधीत रजा घ्यावी, हे ठरविण्याचा अधिकारही महिला वाहकांना असेल. गरोदरपणाच्या पहिल्या चार महिन्यांपर्यंत शैक्षणिक पात्रतेनुसार बैठे काम देण्याचा निर्णय विभागीय पातळीवर घेतला जाईल. तसेच या काळात काही ठराविक महिन्यांपर्यंत सुरक्षित, सुस्थितीत असलेल्या मार्गावर काम देण्याचा निर्णय आगार व्यवस्थापक घेतील, असे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.