Pimpri Chinchwad: महिला डॉक्टरची सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या, पतीसह चौघांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2023 02:30 PM2023-09-23T14:30:09+5:302023-09-23T14:35:02+5:30
महिला डॉक्टरने सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली...
पिंपरी : दवाखाना बांधण्यासाठी माहेरहून पैसे आणावेत, म्हणून सासरच्या मंडळींनी केलेल्या छळाला कंटाळून महिला डॉक्टरने सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. डॉ.अपर्णा अभिजीत शिंदे (वय ३३) असे त्यांचे नाव आहे. ही घटना १५ सप्टेंबरला डुडुळगाव (ता.हवेली, जि. पुणे) येथे घडली.
या प्रकरणी डॉ.अपर्णा शिंदे यांचे भाऊ घन:श्याम भानुदास पवार (कोल्हार, जि.अहमदनगर) यांनी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, पोलिसांनी डॉ.अपर्णा शिंदे यांचा पती डॉ.अभिजीत अशोक शिंदे (४०, रा.अमुल्यम सोसायटी, डुडुळगाव), सासरा अशोक बाबुराव शिंदे (रा.भवतीपूर, अहमदनगर) यांच्यासह दोन महिलांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घन:श्याम यांची बहीण डॉ.अपर्णा यांचा विवाह डुडुळगाव येथे अमूल्यम सोसायटीत राहणाऱ्या डॉ.अभिजीत शिंदेशी झाला असून, लग्नापासूनच पती, सासरा, सासू, नणंद पैशाच्या मागणीसाठी छळ करत होते. दवाखाना बांधण्यासाठी माहेरहून पैसे आणावेत, या मागणीसाठी अपर्णा यांना संशयितांनी मारहाणही केली होती. त्यांना घरातून बाहेर काढले होते. त्यानंतर, त्या १५ सप्टेंबरला सासरी गेल्या होत्या. तेथे पुन्हा माहेरहून पैसे आणावेत, यासाठी पतीसह चौघांनी तगादा लावला. त्याला कंटाळून डॉ.अपर्णा यांनी सातव्या मजल्यावरील फ्लॅटच्या बाल्कनीतून खाली उडी घेतली. त्यांचा जागीच मृत्यू झाला.