Pune News | सायबर चोरट्यांचा डॉक्टर महिलेला दोन लाखांना गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2022 04:15 PM2022-07-04T16:15:46+5:302022-07-04T16:18:48+5:30
बोलण्यात गुंतवून घेतला ओटीपी...
पुणे : आपला गोपनीय क्रमांक कोणाला सांगू नका, ओटीपी कोणाला शेअर करु नका, याविषयी बँका, पोलीस वारंवार जनजागृती करीत असतात. आपल्या मोबाईलवर त्यासंबंधित मेसेज बँकांकडून नियमितपणे पाठविले जातात. असे असतानाही सायबर चोरट्यांच्या जाळ्यात सुशिक्षितच सर्वाधिक अडकत असल्याचे दिसून आले आहे.
क्रेडिट कार्ड बंद करण्याचे असल्याचे सांगणाऱ्या एका नेत्र चिकित्सक महिला डॉक्टराला सायबर चोरट्यांनी बोलण्यात गुंतवून त्यांच्याकडून गोपनीय क्रमांक व ओटीपी जाणून घेतला आणि काही मिनिटात त्यांच्या खात्यातून १ लाख ९७ हजार ८२७ रुपये काढून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी हडपसरमधील एका ३७ वर्षाच्या महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी महिला एका हॉस्पिटलमध्ये नेत्र चिकित्सक आहेत. त्यांना ७ एप्रिल रोजी मोबाईलवर फोन आला. त्याने तुमच्या क्रेडिट कार्डवर इन्शुरन्स व इतर सर्व्हिस चार्ज लागले आहेत, हे तुम्हाला माहिती आहे का असे विचारले. त्यांनी क्रेडिट कार्ड बंद करायचे असल्याचे सांगितले. तेव्हा त्याने तुमच्या कार्डच्या मागे असलेल्या कस्टमर केअर नंबर वरुन तुम्हाला फोन येईल. त्यांना सांगून तुम्ही कार्ड बंद करु शकता, असे सांगितले.
त्यानंतर काही वेळाने १८०० नंबरने सुरु होणाऱ्या नंबरवरुन त्यांना एक फोन आला. त्याने त्यांची माहिती विचारुन घेतली. तुम्हाला कार्ड बंद करायचे असेल तर मागील तीन आकडी नंबर जाणून घेतला. त्यानंता तुम्ही जो पत्ता दिला आहे, त्याच पत्त्यावर रहाता का. बँकेने पत्त्याचे व्हेरिफिकेशन केले का. बँकेचा माणूस तुमच्या घरी येईल, असे सांगत त्यांना बोलण्यात गुंतविले. त्यातच त्यांना त्याने तुम्हाला ओटीपी आला असेल, तो सांगा, असे म्हणाला. बोलण्याच्या नादात त्यांनी त्याला ओटीपी सांगितला.
त्यानंतर काही मिनिटात त्यांच्या खात्यातून सायबर चोरट्यांनी १ लाख ९७ हजार ८२७ रुपये काढून घेऊन खाते रिकामे केले. त्यांनी तातडीने याची तक्रार सायबर पोलिसांकडे केली. सायबर पोलिसांनी पुढील पावले उचलून ही रक्कम ज्या बँकेत गेली, त्यांच्याशी पत्रव्यवहार करुन ही रक्कम गोठविली आहे. पोलीस निरीक्षक शिवले तपास करीत आहेत.