केस घेतली नाही म्हणून महिला वकिलाचा नातेवाईकानेच केला विनयभंग, पुण्यातील घटना
By नितीश गोवंडे | Published: April 25, 2024 02:41 PM2024-04-25T14:41:16+5:302024-04-25T14:42:01+5:30
हडपसर येथे राहणाऱ्या ३० वर्षीय महिलेने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे....
पुणे : केस घेतली नाही याचा राग मनात धरून महिला वकिलाचा हात पकडून विनयभंग केला. तसेच महिलेचे फोटो ऑफिसमधील कर्मचाऱ्यांना दाखवण्याची धमकी दिली. हा प्रकार शिवाजीनगर येथे बुधवारी (दि. २४) सकाळी अकराच्या सुमारास घडला. याप्रकरणी २७ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत हडपसर येथे राहणाऱ्या ३० वर्षीय महिलेने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून पीडित महिलेच्या आईचा आतेभाऊ असलेल्या इसमावर विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी आरोपीची केस घेण्यास नकार दिला होता. याचा राग आरोपीच्या मनात होता. बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास फिर्यादी त्यांच्या ऑफिसमध्ये जात होत्या. त्यावेळी आरोपीने केस घेतली नाही याचा राग मनात धरून फिर्यादी यांच्या ऑफिसच्या पार्किंगमध्ये हात पकडून जोरात ओढले. तु माझी केस घेतली नाही, माझ्याकडे तुझे फोटो आहेत. ते मी तुझ्या ऑफिसमधील सगळ्यांना दाखवेन. तुला या ऑफिसमध्ये काम करु देणार नाही, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सपकाळे या करत आहेत.