राहूतील खेडेकरमळा येथे बिबट्या मादी पिंजऱ्यात जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 12:56 IST2024-12-16T12:55:04+5:302024-12-16T12:56:33+5:30
परिसरात मोठ्या प्रमाणात ऊसाची शेती असल्याने या बिबट्यांंचा मुक्तपणे वावर आहे.

राहूतील खेडेकरमळा येथे बिबट्या मादी पिंजऱ्यात जेरबंद
राहू - दौंड तालुक्यातील राहू परिसरात गेल्या महिनाभरापासून अगदी मुक्तपणे संचार करुन जनावरांवर व पाळीव प्राण्यांवर हल्ले करत लचके तोडून धुमाकूळ घालणारी तसेच शेतकरी, ग्रामस्थांची झोप उडवणारा बिबट्या मादी अखेर सोमवार (दि. १६)रोजी पहाटेच्या सुमारास वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाली आहे.यामुळे भयभीत झालेल्या शेतकरी, ग्रामस्थांचा जीव भांड्यात पडला.
राहू (ता. दौंड) परीसरात देवकरवाडी,पाटेठाण, पिलाणवाडी, डूबेवाडी, दहीटणे,टेळेवाडी, वाळकी, कोरेगाव भिवर,मिरवडी, मगरवाडी आदी गावांच्या परिसरात या बिबट्यांंची पैदास मोठ्या प्रमाणात वाढली असून याठिकाणी वन्य प्राण्यांनी अक्षरश: धुमाकुळ घातला आहे.या परिसरातील अनेक जनावरे व पाळीव प्राण्यांचा फडशा पाडलेला आहे.परिसरात मोठ्या प्रमाणात ऊसाची शेती असल्याने या बिबट्यांंचा मुक्तपणे वावर आहे.
काही दिवसापूर्वी या भागात बिबट्याचे तीन लहान बछडे सापडले होते.यामुळे या भागात बिबट्या असण्याची शक्यता बळावली होती.या बिबट्याच्या दहशतीमुळे या भागात भीतीचे वातावरण होते.शेतकरी वर्ग व शेतमजूर यांना शेतीची कामे करताना या बिबट्याच्या दहशतीखाली कामे करावी लागत होती.खेडेकर मळ्यात वनविभागाने दोन दिवसापूर्वी सायंकाळच्या सुमारास पिंजरा लावला होता.अखेर आज बिबट्यास वनविभागाला जेरबंद करण्यात यश आले.बिबट्या मादी असून तीन वर्षे वयोगटातील आहे.बावधन येथील रेस्क्यू सेंटर येथे प्राथमिक तपासणीसाठी हलविण्यात आले आहे.
दौंड तालुका वनाधिकारी राहुल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिमंडल अधिकारी अंकुश थोरात,राहू येथील वनरक्षक गणेश मस्के,वनसेवक सुरेश पवार,भानुदास कोळपे,दत्तात्रय खोमणे,तेजस ठाकर, गणेश चौधरी यांनी या बिबट्यास जेरबंद करण्यास परीश्रम घेतले.