फेमिनिझम केवळ सोशल मीडियापुरता उरलाय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:11 AM2021-03-08T04:11:54+5:302021-03-08T04:11:54+5:30
स्त्रीवरील अत्याचारांचा विरोध आणि स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कार हे स्त्रीवादाचे मूळ उद्दिष्ट मानले जाते. स्त्रीवाद म्हणजे स्त्री आणि पुरुषांनी मिळून ...
स्त्रीवरील अत्याचारांचा विरोध आणि स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कार हे स्त्रीवादाचे मूळ उद्दिष्ट मानले जाते. स्त्रीवाद म्हणजे स्त्री आणि पुरुषांनी मिळून पुरुषसत्ताक व्यवस्थेविरोधात दिलेला लढा... त्यामुळे मुळातच ‘समता’ हा स्त्रीवादाचा पाया आहे. स्त्रीवाद म्हणजे पुरुषांना विरोध ही मानसिकता पूर्णपणे बदलण्याची गरज आहे. स्त्रीवादामध्ये एलजीबीटीक्यू कम्युनिटीलाही अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होत आहे. तीही माणसे आहेत आणि समाजाच्या मुख्य प्रवाहातील घटक आहेत, हे विसरून चालणार नाही, असे मत स्त्रीवादी कार्यकर्त्यांकडून अधोरेखित केले जात आहे.
‘मिळून सा-याजणी’ मासिकाच्या संपादिका गीताली वि. म. म्हणाल्या, ‘फेमिनिझम केवळ सोशल मीडियापुरता उरलेला आहे, असे मला वाटत नाही. फेमिनिझम स्त्री-पुरुषांच्या जीवनात खोलवर रुजलेला आहे. पूर्वीसारखे मोर्चे, आंदोलने, स्त्री संघटनांचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर होत आहेत, असे चित्र दिसत नाही. कारण चळवळीने आता पुढचा टप्पा गाठला आहे. स्त्री-स्वातंत्र्य, स्त्री-पुरुष समता याला ब-यापैकी महत्त्व दिले जात आहे. दोघेही एकमेकांच्या मदतीने संसार पुढे नेत आहेत. समाजात मूल्यात्मक बदल झाले आहेत, असे म्हणता येणार नाही. मात्र, बदलाला सुरुवात झाली आहे, असे नक्कीच म्हणता येईल. एकीकडे स्त्रीला आर्थिक स्वातंत्र्य मिळत आहे, तर दुसरीकडे स्त्रियांवरील अत्याचार, घरगुती हिंसाचारात वाढ झाली आहे. समाजाची मानसिकता पूर्ण बदलण्यासाठी आणखी बरीच वर्षे जावी लागतील. तोवर स्त्री-पुरुष दोघांनी मिळून पुरुषसत्ताक व्यवस्थेविरोधात लढा देत राहणे हेच चळवळीचे स्वरूप असेल.’
कवयित्री डॉ. अश्विनी धोंगडे म्हणाल्या, ‘आजच्या बहुतांश स्त्रिया आपले कुटुंब, प्रतिष्ठा यामध्ये रमल्या आहेत. त्यामुळे समाजात इतरत्र काय चालले आहे, याबाबत फारशी सजगता पाहायला मिळत नाही. स्त्रीवादी व्यक्तीमध्ये अस्मितेची जाणीव, खंबीरपणा यांची कमतरता पाहायला मिळत आहे. सोशल मीडियातून व्यक्त होणे सोपे असले तरी निरीक्षणातून मांडणी करताना अभ्यासाची बैठक लागते. स्त्रीवादी लेखनही आता पूर्वीसारखे राहिलेले नाही. लेखनातून अनुभव विस्तृतपणे मांडण्याची गरजच वाटत नाही. साहित्यात बदलत्या समाजाचे वास्तव जोरकसपणे मांडले गेले पाहिजे. फेमिनिझम अर्थात स्त्रीवाद ही आयुष्यभराची विचारांची बांधिलकी असायला हवी. व्यावसायिक आयुष्यातही स्त्री-पुरुष समता पिरॅमिडसारखी पाहायला मिळते. हे चित्र बदलण्याची गरज निर्माण झाली आहे.’