धोकादायक नाल्याला कुंपणाची सुरक्षा
By admin | Published: June 27, 2017 07:39 AM2017-06-27T07:39:04+5:302017-06-27T07:39:23+5:30
नाल्यात पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला, या विरोधात आंदोलने झाली, मात्र पावसाळा सुरू झाला तरी रेल्वे प्रशासन सुरक्षाकवच देण्याकडे
लोकमत न्यूज नेटवर्क
दौंड : नाल्यात पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला, या विरोधात आंदोलने झाली, मात्र पावसाळा सुरू झाला तरी रेल्वे प्रशासन सुरक्षाकवच देण्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीत दिसून आले. ढापे नसल्याने हा नाला धोकादायक ठरत आहे.
गेल्या पंधरवड्यात नाल्यात पाय घसरून महादेव शितोळे (वय ४२, रा. अजनुज, ता. श्रीगोंदा) ही व्यक्ती पडली. नाल्यातील पाण्याच्या प्रवाहामुळे वाहत गेल्याने त्यांचा दुर्दैैवी मृत्यू झाला. यानंतर नाल्यावर ढापे बसवावेत म्हणून राष्ट्रवादी, शिवसेना आणि राजकीय मंडळींनी आंदोलने केली. मात्र याचे कुठलेही सोयरसुतक रेल्वे प्रशासनाला दिसत नाही.
पावसाळ्याच्या तोंडावर ‘लोकमत’ने नाल्याची पाहणी केली. येथील शालीमार चौकातून रेल्वे नाल्याचा उगम झाला आहे. शहरी भागातून हा नाला भीमा नदीला जोडला गेला आहे. साधारणत: पाऊण किलोमीटरचा असून पाच ते सात फूट खोली, तीन ते चार फूट
रुंदी आहे.
येथील रेल्वे कुरकुंभ मोरी, नेने चाळ, खाटिक गल्ली, इंदिरानगर झोपडपट्टी या नागरी वस्तीतून अनेक वर्षांपासून हा नाला मार्गस्थ आहे. नाल्यामधील रेल्वेचे सांडपाणी कायमच वाहत असल्याने या नाल्याच्या दुतर्फा राहात असलेल्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
दुर्गंधीचा उपद्रव नागरिकांना सोसावा लागत आहे. रेल्वे प्रशासनाला वेळोवेळी सूचना देऊन देखील काही उपयोग आजपावेतो झालेला नाही.
प्रशासनाच्या विरोधात तीव्र संताप आणि आंदोलने झाल्यामुळे नाईलाजास्तव रेल्वे कुरकुंभ मोरीजवळ नाल्याच्या बाजूला लोखंडी कुंपण घातले आहे. मात्र नाला आहे
तसाच असून, यावर ढापे टाकले नाहीत. परिणामी कुठलीही सुरक्षितता नाही. पावसाळ्यात या नाल्यात केव्हा काय विपरित घडेल याची शाश्वती नाही.