मेथी, कोथिंबीर 2 ते 4 रुपये जुडी, रविवारी मार्केट यार्डमध्ये उच्चांकी आवक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2017 10:18 PM2017-12-03T22:18:58+5:302017-12-03T22:19:09+5:30
पुणे: सध्याच्या वातावरण पालेभाज्यांच्या उत्पन्नासाठी अत्यंत पोषक असल्याने रविवारी गुलटेकडी मार्केट यार्डामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पालेभाज्यांची आवक झाली.
पुणे: सध्याच्या वातावरण पालेभाज्यांच्या उत्पन्नासाठी अत्यंत पोषक असल्याने रविवारी गुलटेकडी मार्केट यार्डामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पालेभाज्यांची आवक झाली. यामध्ये कोथिंबीर आणि मेथीची तर प्रत्येकी दोन ते अडीच लाख जुडी आवक झाल्याने दर प्रचंड कोसळले. चार पैसे जास्त मिळण्याच्या अपेक्षाने पुणे जिल्ह्यासह जळगाव, अमरावती भागातून शेतक-यांनी पुण्यातील मार्केट यार्डात कोथिंबीर, मेथी विक्रीसाठी आणली. परंतु दर कोसळल्याने शेतक-यांना मातीमोल किंमतीला भाजी द्यावी लागली. यामुळे गाडीभाडे देखील सुटेल नसल्याची प्रतिक्रिया काही शेतक-यांनी दिली.
राज्यात दिवाळीपूर्वी सर्वच भागात झालेल्या धुवाधार परतीच्या पावसामुळे पालेभाज्या व फळभाज्याचे प्रचंड नुकसान झाले. सलग आठ ते दहा दिवस मुसळधार पाऊस सुरु होता. त्यामुळे त्यानंतर भाजीपाल्याचे दर वाढतच गेले. दिवळीनंतर हे दर मोठ्या प्रमाणात कडाडले होते. वीस दिवसांपूर्वी कोथिंबीरीचे दर तर ४० ते ५० रुपयांच्या पुढे गेले होते. तर मेथीच्या भाजीची जुडी १५ ते २५ रुपयांनी विक्री केली गेली. परंतु आता मार्केट यार्डमध्ये पालेभाज्या व फळभाज्याची आवक नियमित सुरु झाली आहे. हिवाळा भाजीपाल्याच्या उत्पन्नासाठी चांगला हंगाम मानला जातो.
गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड येथील तरकारी विभागात कोथींबीरीची दोन लाख २५ हजार गड्डी आवक स्थानिक परिसरातून झाली आहे़ मेथीची १ लाख ७५ हजार जुडींची आवक झाली. आवक वाढल्याने मेथी, कोथिंबीरचे दर पडले असल्याची माहिती आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी दिली.
पालेभाज्या सर्वसामान्यांच्या आवाक्यात
पालेभाज्यांची आवक वाढली आहे. त्यामुळे सर्व पालेभाज्यांच्या भावात घसरण झाली असून, भाव सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले आहेत. कांदापात आणि करडईच्या भावात गेल्या आठवड्याच्या तुलनेत शेकडा गड्डीमागे प्रत्येकी ४०० रुपये, तर चवळईच्या भावात ३०० रुपये, कोथिंबीर आणि हरभरा गड्डीच्या भावात प्रत्येकी २०० रुपयांनी घट झाली आहे. घाऊक बाजारात कोथिंबीर आणि मेथीच्या जुडीला २ ते ४ रुपये मोजावे लागत आहेत. तर किरकोळ बाजारात १० रुपये भावाने जुडीची विक्री होत आहे. आवक घटल्याने केवळ चवळईच्या भावात मात्र शेकडा जुडीमागे घाऊक बाजारात ३०० रुपयांनी वाढ झाली आहे. उर्वरित पालेभाज्यांचे उतरलेले भाव कायम आहेत. पुढील काही दिवस ही परिस्थिती कायम राहिल, असा अंदाज भुजबळ यांनी व्यक्त केला.