खतांची दरवाढ शेतकऱ्यांवर अन्याय करणारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:11 AM2021-05-19T04:11:11+5:302021-05-19T04:11:11+5:30
पुणे : ऐन कोरोना काळात सगळेच खर्चाने त्रस्त असताना खतांच्या दरामध्ये केलेली वाढ शेतकऱ्यांवर अन्याय करणारी असल्याची तक्रार आम ...
पुणे : ऐन कोरोना काळात सगळेच खर्चाने त्रस्त असताना खतांच्या दरामध्ये केलेली वाढ शेतकऱ्यांवर अन्याय करणारी असल्याची तक्रार आम आदमी पार्टीच्या राज्य शाखेने थेट पंतप्रधानांकडेच केली आहे.
खासदारांनी यात लक्ष घालावे, अशी विनंती त्यांनी राज्यातील विरोधी तसेच सत्ताधारी खासदारांंना पत्राद्वारे केली आहे. यामुळे आधीच हैराण झालेला शेतकरी कोलमडून पडेल व त्यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ होईल, अशी भीती आपच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत म्हणाले, या वाढीचा परिणाम म्हणून सर्वच पिकांचा हेक्टरी किमान ५००० रुपये उत्पादन खर्च वाढू शकतो. त्यातून छोटे शेतकरी अधिक अडचणीत येतील. कोर्पोरेट क्षेत्रासाठी पायघड्या घालणारे सरकारची नवे कृषी कायदे आलेत. शेती क्षेत्रातून छोटा शेतकरी उखडून टाकण्याचे आणि मोठ्या भांडवलदारांच्या हातात भारतातील शेती देण्याचा डाव यामागे असल्याचे दिसते आहे.
कोणत्याही वस्तूचे दर काही विशिष्ट पातळीत वाढतात, असे असताना खतांच्या किमतीतील थेट ५५ टक्के दरवाढ अनाकलनीय आहे, असे किर्दत म्हणाले. खतांचा दर असा वाढवताना केंद्र सरकारने कपाशी, तांदूळ, ज्वारी, गहू या पिकांच्या हमीभावात मात्र फक्त २ ते ३ टक्के वाढ केली आहे. शेतीक्षेत्रात काम करणाऱ्या आपच्या अभिजित मोरे, संदीप सोनावणे, गणेश ढमाले, श्रीकांत आचार्य, तुषार कासार असगर बेग,चंद्रकांत पानसे, सैद अली, विक्रम गायकवाड, सतीश यादव, संदेश दिवेकर, रवींद्र आदरकर, मनोज थोरात व अन्य कार्यकर्त्यांनी पंतप्रधानांंना पत्र पाठवून कळवले आहे.