पुणे महापालिकेचा पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा नारा; निर्माल्यापासून होणार खत निर्मिती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 05:26 PM2020-08-24T17:26:50+5:302020-08-24T18:02:07+5:30
पुणे शहरात जवळपास चार लाख घरगुती गणपती बसतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात निर्माल्य निर्माण होते..
पुणे : यंदाच्या गणेशोत्सवात निर्माल्य गोळा करण्याची व्यवस्था पालिकेने लावली असून स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून गोळा होणाऱ्या निर्माल्यापासून खत निर्मिती केली जाणार आहे. त्यासाठी पाषाण येथील पालिकेच्या उद्यानासह सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशपांडे उद्यानात जागा देण्यात आली आहे. गेल्या वर्षी गणेशोत्सवामध्ये तब्बल ९०० मेट्रिक टन निर्माल्य निर्माण झाले होते. यंदाही मोठ्या प्रमाणावर निर्माल्य जमा होणार असल्याचा अंदाज आहे.
शहरात जवळपास चार लाख घरगुती गणपती बसतात. त्या प्रमाणात निर्माल्य निर्माण होते. हे निर्माल्य स्वच्छ सेवा सहकारी संस्थेकडून गोळा केले जाणार आहे. तर, मंडळांचे निर्माण होणारे निर्माल्य माय अर्थ या संस्थेकडून गोळा केले जाणार आहे. निर्माल्य गोळा करण्याचे त्रिस्तरीय काम केले जाणार आहे. स्वच्छच्या कर्मचाऱ्यांनी घरोघर गोळा केलेला निर्माल्य कचरा हस्तांतरण केंद्रावर पोचविला जाणार आहे. तेथून पालिकेच्या कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांमधून हे निर्माल्य पाषाण येथील उद्यानामध्ये पोचविले जाणार आहे. या ठिकाणी त्याचे खत केले जाणार आहे. त्यासाठी कमिन्स इंडिया ही कंपनी मदत करणार आहे.
तर, माय अर्थ ही संस्था मंडळांकडून गोळा केलेले निर्माल्य पु. ल. देशपांडे उद्यानात खत निर्मिती करणार आहे. गेल्या वर्षी पालिकेने एकूण ९०० मेट्रिक टन निर्माल्य गोळा केले होते. यंदा त्याचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. हे खत आवश्यकतेनुसार वाटण्यात येणार आहे.
---------
पालिकेच्या फिरत्या हौदांमध्ये विसर्जन केलेल्या गणेशमूर्ती, तसेच मूर्तीदान केलेल्या मुर्त्या वाघोली येथील खाणीमध्ये नेल्या जातात. त्याठिकाणी आणलेल्या मूर्त्यांचे वर्षभरात विघटन होऊन त्याची माती होते.