शिरूर तालुक्यात खताचा तुटवडा, शेतकऱ्यांची धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:13 AM2021-07-07T04:13:13+5:302021-07-07T04:13:13+5:30
शिरूर तालुक्यात जून महिन्यात पावसाचे आगमन झाले. त्यानंतर लगोलग शेतकऱ्यांनी शेतीच्या मशागती करून मोठ्या प्रमाणावर ऊसलागवडी केल्या आहेत. त्यामुळे ...
शिरूर तालुक्यात जून महिन्यात पावसाचे आगमन झाले. त्यानंतर लगोलग शेतकऱ्यांनी शेतीच्या मशागती करून मोठ्या प्रमाणावर ऊसलागवडी केल्या आहेत. त्यामुळे त्या ऊस लागवडींना पहिल्या डोससाठी रासायनिक खते व यामध्ये प्रामुख्याने युरियाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. मात्र गेल्या काही दिवसांपासून या परिसरात या खतांची मोठ्या प्रमाणावर टंचाई जाणवू लागली आहे. ऊस या पिकाबरोबरच बाजरी, कडधान्ये पिके यांच्याही खुरपणीची कामे सगळीकडे वेगाने सुरू असून युरिया खतासाठी शेतकऱ्यांना वणवण भटकावे लागत आहे. अनेक कृषी दुकानदार हे शेतकऱ्यांना आधार कार्ड द्या मग खते देऊ, अशी मागणी करतात. तसेच ज्या शेतकऱ्यांनी बाजरीचे बी कृषी दुकानातून विकत घेतले आहे, असे काही कृषी दुकानदार त्याच शेतकऱ्यांना युरिया विकत आहेत असल्याचे बोलले जात आहे.
आलेगाव पागा येथील कृषी सेवा केंद्राचे सोमेश्वर धावडे म्हणाले की, खताच्या कंपनीकडून युरिया खताच्या बरोबरीने मायक्रोला, बायोला, सागरिका लिक्विड यांची अतिरिक्त खरेदी करावी, अशी या कृषी व्यावसायिकांना सक्ती केली जाते. ही अतिरिक्त जोडखते घेणं आम्हा व्यावसायिकांना परवडणे शक्य नाही तसेच शेतकरी हे युरिया खताची मागणी करतात. मात्र ही जोडखते घेण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे युरियाची खरेदी केली जात नाही व याच कारणामुळे युरिया खताचा तुटवडा जाणवत आहे.
याबाबत काही कृषी व्यावसायिकांनी सांगितले की, दरवर्षी याच दिवसांत खताचा तुटवडा जाणवत असतो. शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता शासनाने हस्तक्षेप करून युरियाची उपलब्धता वाढवावी, अशी मागणी आहे.