बारामती तालुक्यात शेतकऱ्यांना थेट बांधावर होतोय खत पुरवठा, ४४ लाख ६३ हजारांची उलाढाल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 12:47 PM2020-05-19T12:47:37+5:302020-05-19T13:07:33+5:30
संचारबंदी काळामध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बियाणे, खते यांचा पुरवठा वेळेत होणे गरजेचे होते.
रविकिरण सासवडे-
बारामती : संचारबंदी काळात कृषि विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना थेट बांधावर खत पोहच करण्यात येत आहे. बारामती तालुक्यात आतापर्यंत ४४ लाख ६३ हजार ८५२ किंमतीची खते शेतकऱ्यांना बांधावर देण्यात आले आहे. या योजनेचा तालुक्यातील १ हजार ३८९ शेतकऱ्यांना २४३ शेतकरी गटांच्या माध्यमातून फायदा मिळाला आहे.
संचारबंदी काळामध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बियाणे, खते यांचा पुरवठा वेळेत होणे गरजेचे होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू असल्याने शेतरकऱ्यांनी कृषि सेवा केंद्रावर जाऊन निविष्ठा खरेदी करताना संचारबंदी नियमावलीचे पालन न केल्यास कोरोना साथीचा फैलाव होण्याचा धोका होता. हा धोका टाळण्यासाठी कृषि विभागाच्या आदेशाने शेतकऱ्यांना आवश्यक खते थेट बांधावर पोहच करण्याबाबतचा २७ एप्रिल २०२० रोजी घेण्यात आला होता. त्या निर्णयाप्रमाणे बारामती तालुक्यातील बारामती, सुपे, उंडवडी सुपे,वडगाव निंबाळकर या चार मंडळामध्ये आत्मा अंतर्गत असणारे सर्व शेतकरी गट व ज्या शेतकऱ्यांना या योजनेतर्गंत बांधावर खत हवे होते अशा शेतकऱ्यांचे गटतयार करण्यात आले. या एका गटामध्ये सुमारे २० शेतकरी घेण्यात आले.आपल्याला आवश्यक असणारी खते व बियाणे यांची मागणी सबंधीत गटप्रमुखाकडे शेतकऱ्यांनी नोंदवल्यानंतर तो गटप्रमुख कृषि सेवा केंद्रामधून खतांची खरेदी करीत असल्याने कृषि सेवा केंद्रामध्ये होणारी गर्दी देखील यामुळे कमी झाली. यावर थेट कृषि विभागाचे नियंत्रण असल्याने जास्त दराने होणारी खत विक्री थांबली गेली. तसेच शेतकऱ्यांना देखील गुणवत्तापूर्ण व विश्वासार्ह खते मिळणे सुलभ झाले.
आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर निविष्ठा खरेदीमध्ये पारदर्शकता यावी यासाठी संबंधित गावातील विक्रेता, कृषि सहायक, कृषि पर्यवेक्षक वकृषि अधिकारी यांच्यामध्ये समन्वय ठेवण्याच्या सुचना कृषि विभागाच्यावतीने देण्यात आल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही. तसेच ३१ मे २०२० पूर्वी खरीपाच्या पेरण्या सुरू होण्यापूर्वी तालुक्यातील शेतकऱ्यांना आवश्यक खतांचा पुरवठा होणार आहे.
तालुक्यामध्ये बांधावर शेतकऱ्यांना खते पोहच करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी कृषि विभाग देखील यावर लक्ष ठेवून आहे. एखाद्या शेतकऱ्यांची फसवूक झाल्यास त्याने तक्रार करावी. त्यानुसार संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.
- दत्तात्रय पडवळ, तालुका कृषि अधिकारी, बारामती
...........
मंडळ शेतकरी खते रक्कम
गट (टनामध्ये)
बारामती ६१ ८४.३ ९,८१,३६५
सुपे ७२ ५७ ८,०५,९३६
उंडवडी ४० ९१ १२,१७,६७३
सुपे - - -
वडगाव ७० ८० १४,५८,८७८
निंबाळकर
एकूण २४३ ३१२.३ ४४,६३,८५२