नीरा येथे पर्युषण पर्व उत्साहात, पालखी सोहळाही उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 11:30 PM2018-09-30T23:30:03+5:302018-09-30T23:30:57+5:30
पर्युषण पर्व व षोडशकारण व्रत यांची पालखी डॉ. निरंजन शहा यांच्या घरापासून मंदिरापर्यंत सवाद्य काढण्यात आली. पालखीमागून जोडीने कुंभ घेऊन फिरण्याचा मान नवेंदू शहा व नेहा शहा या उभयतांना मिळाला.
नीरा : येथे पर्युषण पर्व उत्साहात पार पडले. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जैन धर्मामध्ये भाद्रपदामध्ये येणारे पर्युषण पर्व सणांचा राजा म्हणून ओळखला जातो. या दहा दिवसांच्या पर्वात रोज सकाळी भगवंताचा पंचामृत अभिषेक, दुपारी तत्त्वार्थ, संध्याकाळी शास्त्रपठण, आरती, स्पर्धा, प्रश्नमंच आदीचे संयोजन करण्यात आले होते. या पर्वात नीरा येथील अनुजा निरंजन शहा यांनी षोडशकारणाचे सोळा उपवास, सिद्धांत शहा, प्रगती शहा यांनी रत्नत्रांचा तीन उपवास विबुद्धसागरमहाराजांच्या पावन सान्निध्यामध्ये केले.
पर्युषण पर्व व षोडशकारण व्रत यांची पालखी डॉ. निरंजन शहा यांच्या घरापासून मंदिरापर्यंत सवाद्य काढण्यात आली. पालखीमागून जोडीने कुंभ घेऊन फिरण्याचा मान नवेंदू शहा व नेहा शहा या उभयतांना मिळाला. यावेळी मंदिरात विविध बोली होऊन भगवंताचा पंचामृत अभिषेक करण्यात आला. यावेळी विबुद्धसागरमहाराजांचा ६३ वा जन्मदिवस, ११ वा एलाचार्य दिवस, तसेच आचार्य पदग्रहण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. विश्वस्त मनोज शहा यांनी प्रस्तावना करून धार्मिक कार्य करीत असताना कोणी दुखावले असेल तर त्याबद्दल क्षमापना केली. जैन धर्मात क्षमेला फार महत्त्व आहे. कुंथुसागरमहाराज यांनी विबुद्धसागरमहाराज यांना आचार्यपद घोषित केले. त्या पत्राचे वाचन रमणिकलाल कोठडिया यांनी केले.
अनुजा निरंजन शहा यांनी षोडशकारण व्रत केल्याप्रीत्यर्थ डॉ. निरंजन शहा यांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते. यावेळी प्रद्युम्नकुमार व्होरा, निष्कलंक शहा, अरविंद शहा, नीरज शहा, डॉ. नीना शहा, रेणुका कोठडिया, तनुजा शहा, सुजाता शहा, वैशाली गांधी आदी जैनबांधव उपस्थित होते.