महोत्सव ही चित्रपट संस्कृतीची चळवळ - सतीश जकातदार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 02:39 AM2018-12-24T02:39:38+5:302018-12-24T02:39:54+5:30
आशय फिल्म क्लबतर्फे आयोजित ९ व्या आशियाई चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन आज (२४ डिसेंबर) राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त आसामी आणि हिंदी चित्रपट दिग्दर्शक जानू बरूआ यांच्या हस्ते राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात संध्याकाळी ६ वाजता होणार आहे.
- प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे - आशय फिल्म क्लबतर्फे आयोजित ९ व्या आशियाई चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन आज (२४ डिसेंबर) राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त आसामी आणि हिंदी चित्रपट दिग्दर्शक जानू बरूआ यांच्या हस्ते राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात संध्याकाळी ६ वाजता होणार आहे. युरोपियन आणि आशियाई चित्रपटांमधील तफावत, वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांचा प्रभाव, आयोजनामागील भूमिका, प्रेक्षकांची चित्रपट साक्षरता याबाबत संयोजक सतीश जकातदार यांच्याशी ‘लोकमत’ प्रतिनिधीने संवाद साधला. चित्रपट महोत्सव ही चित्रपट संस्कृतीची एक चळवळ असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
चित्रपटांचे वेगळेपण कशा पद्धतीने अधोरेखित होते?
१ सध्याचे युग स्पर्धात्मक आहे. प्रेक्षक चहूबाजूंनी सिनेमाने घेरलेला असताना, वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांकडे प्रेक्षकांना खेचणे, हे नवे आव्हान समोर आहे. व्यावसायिक चित्रपटांसारखे महोत्सवातील चित्रपटांचे मार्केटिंग करता येत नाही. त्यामुळे महोत्सव ही चित्रपट संस्कृतीची हळूहळू पुढे जाणारी चळवळ आहे. प्रेक्षकांची अभिरुची काळाच्या ओघात बदलली आहे. त्यांच्यावर सातत्याने चित्रपटांचा, मनोरंजनाच्या साधनांचा भडिमार होत आहे. व्यावसायिक चित्रपटांचे मोठ्या प्रमाणात मार्केटिंग होते. नेटफ्लिक्स, अॅमेझॉन अशा विविध माध्यमांतून चित्रपट आदळत असतात. यातून नेमकी निवड कशी करायची, याची दिशा चित्रपट महोत्सवांमधून मिळते. एखाद्या देशातील कोणत्या दिग्दर्शकाचे चित्रपट पाहावेत, त्या देशात चित्रपट क्षेत्रात कोणते नवे प्रयोग होत आहेत, याबाबत महोत्सवांमधून जाणून घेता येते.
युरोपियन आणि आशियाई चित्रपटांमध्ये प्रामुख्याने कोणता फरक पाहायला मिळतो?
२ गेल्या दशकात कोणत्याही चित्रपट महोत्सवांवर युरोपियन चित्रपटांचे वर्चस्व असायचे. त्यामुळे अमेरिकन आणि युरोपियन चित्रपटांनाच पुरस्कार मिळायचे. सिनेमा उद्योगावरही या चित्रपटांचा पगडा पाहायला मिळतो. त्या तुलनेत, आशियाई देशातील चित्रपटांना तितकेसे महत्त्व प्राप्त झाले नव्हते. काही महोत्सवांमध्ये हळूहळू आशियाई चित्रपट दिसू लागले, पुरस्कार पटकावू लागले. त्यातून आशियाई चित्रपटांचे महत्त्व वाढत गेले. युरोपियन चित्रपटांच्या तुलनेत आशियाई चित्रपटांची खासियत वेगळी आहे. युरोप, अमेरिकेतील समस्यांपेक्षा आशिया खंडातील देशांच्या समस्या वेगळ्या आहेत. परंपरा, संस्कृती, परंपरा आणि आधुनिकता यातील संघर्ष वेगवेगळ्या पातळ्यांवरील आहे.
आशियाई चित्रपट महोत्सवामागील उद्दिष्ट काय?
३ समृद्ध राष्ट्रांपेक्षा विकसनशील देशांमधील कथा, कथानके, प्रश्न वेगळे आहेत. वास्तवाचे प्रतिबिंब चित्रपटांमध्ये पाहायला मिळते. त्यामुळे, आशियाई देशातील चित्रपटांचा प्रभाव इतर महोत्सवांमध्ये दिसत नव्हता. हीच बाब लक्षात घेऊन २०१० मध्ये स्वतंत्र आशियाई चित्रपट महोत्सवाचा श्रीगणेशा झाला. दिल्ली, मुंबई आणि पुण्यामध्ये हा महोत्सव आयोजित केला जातो. आशियाई चित्रपट महोत्सव ही एक चळवळ आहे.
तंत्रज्ञानामुळे आयोजनाच्या
जबाबदारीत काय फरक पडला?
४ जागतिकीकरणाच्या काळात तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे, आधुनिकीकरणाचा वेग प्रचंड आहे. चित्रपटांनी सेल्युलॉईड ते डिजिटल असा प्रवास केलेला आहे. पूर्वी आयोजनात खूप अडचणी होत्या. ३५ एमएमची रिळे रेल्वे किंवा विमानाने यायची, ती सोडवावी लागायची, त्यात अडचणी निर्माण व्हायच्या, शेवटपर्यंत या अडचणी सुटतील की नाही याची चिंता असायची. आता डिजिटल तंत्रज्ञानामुळे ही प्रक्रिया वेगाने होते. त्यामुळे आयोजनामध्ये सुकरपणा आला आहे. पूर्वी चित्रपटांची निवड त्यांना मिळालेले पुरस्कार आणि माहितीच्या आधारे करावी लागायची. आता, चित्रपट प्रत्यक्ष पाहून निवड करता येते. चित्रपट उत्तम आहे की नाही, याची खात्री करून घेता येते. त्यामुळे आयोजनातील समस्या तंत्रज्ञानामुळे दूर झाल्या आहेत.
प्रेक्षकांची चित्रपट साक्षरता वाढीस लागण्यास महोत्सवामुळे मदत होईल का?
५ भारतातील अनेक चांगले प्रादेशिक चित्रपट प्रेक्षकांना माहीत नाहीत. प्रादेशिक चित्रपटांची जाणीव करून देणे हा या महोत्सवाचा उद्देश आहे. यातून चित्रपट संस्कृतीचा, त्यातील वेगळ्या धाटणीच्या प्रयोगांचा प्रचार आणि प्रसार होऊ शकतो. चित्रपट विविध माध्यमातून मोबाईलवर पाहता येत असले तरी ते मोठ्या पडद्यापर पाहणे हा विलक्षण अनुभव असतो. सिनेमे लहान पडद्यावर पाहिले की माहितीसारखे मनात साठतात; मात्र, चित्रपटांचा अनुभव मोठ्या पडद्यावरच घेता येऊ शकतो. त्यामुळे चित्रपट महोत्सवांचे महत्त्व आणि प्रभाव अधिक आहे. सर्वार्थाने विचार करून केलेले सिनेमे यातून पाहण्याची संधी मिळते. बरेचदा चांगले कथानक असलेले प्रभावी चित्रपट दुर्लक्षित राहतात, प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाहीत. मार्केटिंगअभावी त्यांचा प्रभाव कमी होतो. असे चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
आवर्जून पाहावे असे चित्रपट
काझीम ओझ दिग्दर्शित ‘झेर’
अंशुल चौैहान दिग्दर्शित
‘द बॅड पोएट्री’
कामाख्य नारायण सिंग
दिग्दर्शित ‘भोर’
जटला सिद्धार्थ दिग्दर्शित
‘लव्ह अँड शुक्ला’
देयाली मुखर्जी दिग्दर्शित
‘तीन मुहूर्त’
तन्वीर एहसान दिग्दर्शित ‘सिन्सिअरली युवर्स ढाका’