किल्ले सिंहगडावर दीपोत्सव
By admin | Published: November 12, 2015 02:35 AM2015-11-12T02:35:42+5:302015-11-12T02:35:42+5:30
तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची साक्ष असलेला ऐतिहासिक सिंहगड शिवप्रेमींना स्वराज्य निष्ठेची शिकवण देत, गड-किल्ल्यांकडे आकर्षित करू लागला असून,
सिंहगड रस्ता : तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची साक्ष असलेला ऐतिहासिक सिंहगड शिवप्रेमींना स्वराज्य निष्ठेची शिकवण देत, गड-किल्ल्यांकडे आकर्षित करू लागला असून, दीपावलीच्या उत्सवकाळातही शिवप्रेमी मावळ्यांची पाऊले मालुसरेंना आदरांजली वाहण्यासाठी गडाकडे वळू लागली आहेत.
या वर्षीही नरकचतुर्दशीच्या मंगलदिनी कोंढवे-धावडे येथील भूलेश्वर तरुण मंडळाने पुणे दरवाजा व पादचारी मार्गावर आकर्षक विद्युत रोषणाई केली होती. त्यासाठी खास जनरेटरची व्यवस्था करण्यात आली होती. उपसरपंच अतुल (अप्पा) धावडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी ऐतिहासिक पुणे दरवाजा व पादचारी मार्गावर विद्युत दिव्यांची रोषणाई केल्याने दरवाजे व पादचारी मार्ग उजळला होता.
या सणाचे औचित्य साधून सतत अभिनव उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. या पराक्रमी सेनापतीला आदरांजली वाहण्याचा हा प्रयत्न आहे. पहिल्या दिवशी नांदेड येथील सन्मित्र फाउंडेशनच्या वतीने मालुसरे यांच्या समाधिस्थळी दीपोत्सव केला गेला होता. तसेच कोंढाणेश्वर मंदिरात पूजा, अभिषेक करून फुलांच्या माळा लावून मंदिर आकर्षितपणे सजविले होते.
राहुल घुले मित्र परिवाराने त्या कार्यक्रमाचे अतिशय नेटकेपणाने आयोजन केले होते. ऐतिहासिक वास्तूला रोषणाई व सजावट करण्याचा उत्सवाचा मूळ हेतू आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी खंडोजी नाईक-कोळी यांचे वंशज व स्थानिक ग्रामस्थांकडून अभिषेक, दीपोत्सव केला जाणार असून, चौथ्या दिवशी ढमढेरे परिवार व शिवप्रेमी राजाराममहाराज समाधिस्थळी दीपोत्सव करतील. पाचव्या दिवशी सिंहगड पावित्र्य मोहिमेच्या कार्यकर्त्यांकडून अमृतेश्वर मंदिरात दीपोत्सव व विशेष सजावट केली जाणार आहे. (वार्ताहर)