पाहुनी समाधीचा सोहळा। दाटला इंद्रायणीचा गळा।।

By admin | Published: November 21, 2014 04:09 AM2014-11-21T04:09:31+5:302014-11-21T04:10:12+5:30

राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो भाविकांनी हा सोहळा प्रत्यक्ष नयनांनी अनुभवत ‘श्रीं’चे दर्शन घेतले.

Festival of Patients Dandla Indrayani necklace .. | पाहुनी समाधीचा सोहळा। दाटला इंद्रायणीचा गळा।।

पाहुनी समाधीचा सोहळा। दाटला इंद्रायणीचा गळा।।

Next

आळंदी :
पाहुनी समाधीचा सोहळा।
दाटला इंद्रायणीचा गळा।।
बाळ सिद्ध पाहता चिमुकला।
कुणी गहिवरे कुणी हळहळे।।
भाळी लावून चरण रजाला
चरणावरी लोळला।
चोखा गोरा आणि सावता।।
निवृत्ती हा उभा एकटा। सोपानासह उभी मुक्ता अश्रुपूर लोटला।।
‘ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम...’ असा संजीवन सोहळ्याच्या कीर्तनातील जयघोष... दुपारचे बारा वाजले आणि घंटानाद... समाधीवर पुष्पवृष्टी... संत नामदेव महाराज व माऊलींची भेट... आणि असंख्य भाविकांचे पाणावलेले डोळे... अशा भावपूर्ण वातावरणात श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराजांचा ७१८वा संजीवन समाधी सोहळा गुरुवारी (दि.२०) ‘माऊली-माऊली’च्या जयघोषात पार पडला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो भाविकांनी हा सोहळा प्रत्यक्ष नयनांनी अनुभवत ‘श्रीं’चे दर्शन घेतले.
तत्पूर्वी, माऊलींना पवमान अभिषेक व दुधआरती घालून पहाटे तीनच्या सुमारास प्रमुख विश्वस्त डॉ. प्रशांत सुरु यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. त्यानंतर सकाळी अकरापर्यंत भाविकांच्या महापूजा, दर्शन व नामदेवराय यांच्या वतीने श्रींची महापूजा घेण्यात आली. सकाळी वीणा मंडपात देवस्थानच्या वतीने कीर्तन झाल्यानंतर मुख्य संजीवन सोहळ्याला सुरुवात झाली. दहा वाजता संत नामदेव महाराजांचे वंशज हभप ज्ञानेश्वरमहाराज नामदास यांचे कीर्तन सुरू झाले. मंदिराच्या महाद्वारात काल्याचे कीर्तन व हैबतबाबा दिंडीचे आगमन झाले. टाळ मृदंगाच्या निनादात हैबतबाबांच्या दिंडीने समाधी मंदिरास प्रदक्षिणा पूर्ण करून ज्ञानदेवांचा जयघोष केला. दुपारी बाराच्या सुमारास संजीवन समाधी सोहळ्याच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
घंटानाद, अभिषेक व माऊलींच्या समाधीवर फुलांची पुष्पवृष्टी करून आरती करण्यात आली. संत नामदेव महाराजांच्या पादुका त्यांच्या वंशजांच्यामार्फत वीणा मंडपातून करंज्या मंडप, पंखा मंडप व मुख्य गाभाऱ्यात माऊलींच्या समाधीच्या पुढे विराजमान करण्यात आल्या. त्यानंतर माऊलींना महानैवद्य देऊन देवस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉ. प्रशांत सुरु, विश्वस्त शिवाजीराव मोहिते, विश्वस्त श्यामसुंदर मुळे यांच्या हस्ते चोपदार व प्रमुख मान्यवरांना नारळ प्रसाद देण्यात आला. संत श्री नामदेवमहाराजांच्या वंशजांनी त्यांच्या पादुकांची मंदिर प्रदक्षिणा पूर्ण करून जयजयकार केला.(वार्ताहर)

Web Title: Festival of Patients Dandla Indrayani necklace ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.