उत्सवाला गालबोट लागू नये
By Admin | Published: August 31, 2015 04:07 AM2015-08-31T04:07:20+5:302015-08-31T04:07:20+5:30
गणेशोत्सव हा पुण्याची मान उंचवणारा उत्सव आहे. त्यामुळे या उत्सवाला गालबोट लागणार नाही याची काळजी प्रत्येक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी घेतली पाहिजे
पुणे : गणेशोत्सव हा पुण्याची मान उंचवणारा उत्सव आहे. त्यामुळे या उत्सवाला गालबोट लागणार नाही याची काळजी प्रत्येक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी घेतली पाहिजे. ध्वनिप्रदूषण टाळा तसेच कार्यकर्त्यांनी कोणताही गुन्हा दाखल होणार नाही, याची काळजी घ्या, असे आवाहन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आयोजित राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रविवारी गणेश कला क्रीडा मंच येथे झाला. त्या वेळी ते बोलत होते. खासदार अनिल शिरोळे, अखिल मंडई गणपती मंडळ अध्यक्ष अण्णा थोरात, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, पोलीस उपायुक्त तुषार दोशी, नगरसेवक हेमंत रासने, नगरसेवक रवींद्र माळवदकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
बापट म्हणाले, ‘‘गणेशोत्सवात ज्या ठिकाणी खूप वाहतूककोंडी असेल, त्या ठिकाणी स्वत: कार्यकर्त्यांनी उभे राहून ती समस्या सोडवावी. पोलिसांनादेखील हस्तपेक्ष करण्याची गरज पडणार नाही, यासाठी मंडळेदेखील सक्षम आहेत. तसेच शहरातील सर्वच ट्रस्टने श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचा आदर्श समोर ठेवून सामान्य जनतेला मदतीचा हात पुढे केला तर नक्कीच शासनाचा भार देखील कमी होईन.
समाजामध्ये ऊर्जा निर्माण करणारा हा उत्सव आहे. कारण यातून एक चांगला कार्यकर्ता घडतो. सामाजिक वेदना त्याला कळतात. जर तुम्ही पोलिसांबरोबर काम केले तर हा उत्सव आनंदाने पार पडेल. तसेच तरुणांनो राजकारणात सहभागी व्हा. त्याचे स्वरूप जवळून पाहिल्यावर त्याचे उत्तरदायित्व कळेल, असे मत खासदार अनिल शिरोळे यांनी व्यक्त केले.
(प्रतिनिधी)