काही फुटांवरून ‘त्याने’ पाहिला ‘मृत्यू’, ट्रिगर दाबूनही उडली नाही गोळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:11 AM2021-01-20T04:11:44+5:302021-01-20T04:11:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : चौकात रात्रीच्या वेळी मुलांसोबत थांबलेल्या एका तरुणीला त्याने ‘तू माँट्याच्या नादी लागू नकोस’, असे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : चौकात रात्रीच्या वेळी मुलांसोबत थांबलेल्या एका तरुणीला त्याने ‘तू माँट्याच्या नादी लागू नकोस’, असे सांगितले. त्यावर हे सांगणाऱ्या तरुणावर आरोपीने पिस्तूल रोखले. तेव्हा त्याला आपला मृत्यूच समोर दिला. त्याने एका पाठोपाठ तीनवेळा ट्रिगर दाबले, पण गोळी न उडता त्या पायाजवळ पडल्या. तेव्हा कोयत्याने मारहाण करण्याचा प्रयत्न केला. ते हल्ले त्याने चुकविले. तेव्हा त्या टोळक्याने त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पोलिसांनी या टोळीतील पाच जणांना अटक केली.
आकाश संतोष भारती, अनिकेत ऊर्फ माँटी शरद माने (दोघे रा. तरवडेवस्ती, महंमदवाडी) चेतन पांडुरंग ढेबे (रा. हिंगणे), सनी ऊर्फ गिरीश महेंद्र हिवाळे (रा. काळेपडळ, हडपसर), अंबिका अर्जुन मिसाळ (वय २१, रा. तरवडेवस्ती), काजल मधुकर वाडकर (वय २१, रा. वाडकर मळा, महंमदवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी नागेश पंढरीनाथ मिसाळ (वय ४२, रा. शेवाळे पवार वस्ती, केशवनगर, मुंढवा) यांनी वानवडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार तरवडेवस्तीतील साठेनगर चौकात १७ जानेवारी रोजी रात्री दहा वाजता घडला.
नागेश मिसाळ हे ड्रायव्हर असून उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील आंदोरा येथील राहणारे आहेत. मिसाळ हे आई व बहिणीला भेटून घरी जात असताना रात्री दहा वाजता साठेनगर चौकात आले़. तेथे त्यांना इतर मुलांबरोबर अंबिका मिसाळ दिसली. ते अंबिका हिला ‘तू माँट्याच्या नादी लागू नको,’ असे समजावत होते. त्यावेळी माँटी ऊर्फ अनिकेत माने याने नागेश याच्या कानाखाली जोरात चापट मारली. त्यानंतर आकाश भारती याने मिसाळला सांगितले की, तुझा भाऊ गणेश याने माझ्या मित्र अक्षय याचा मर्डर केला आहे, असे म्हणून त्याने त्याच्याकडील पिस्तूल काढून नागेश याच्यावर रोखले. त्याचा ट्रिगर तीन वेळा दाबला. परंतु, गोळी उडून नागेशला न लागता खालीच पडली. त्यामुळे नागेशचा जीव वाचला.
या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील व इतर अधिकारी घटनास्थळी पोहचले. वानवडी पोलिसांनी अंबिका मिसाळ व काजल वाडकर यांना अटक केली. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत अन्य आरोपी हे चाकणला पळून गेल्याची माहिती मिळाली.
याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी सांगितले की, पोलिसांनी तातडीने हालचाल करुन दोन तरुणींना अगोदर अटक केली. त्यानंतर चाकणपर्यंत माग काढत एकूण ५ जणांना अटक केली आहे. हे सर्व आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत.