मुसळधार पावसाने पुण्यातील रस्त्यांना ओढ्या-नाल्यांचे स्वरुप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2019 07:35 PM2019-06-27T19:35:25+5:302019-06-27T20:40:36+5:30
दुपारी केवळ एक दीड तास झालेल्या पावसाने शहरातील बहुतेक सर्वच रस्त्यांना ओढ्या-नाल्याचे स्वरुप आले.
पुणे: शहरामध्ये गुरुवार (दि.२७) रोजी दुपारी एक दीड तास झालेल्या मुसळधार पावसाने शहरातील बहुतेक सर्वच रस्त्यांना ओढ्या-नाल्याचे स्वरुप आले. शहरामध्ये सुरु असलेली मेट्रोची कामे, कोट्यवधी रुपये खर्च करुन चुकीच्या पध्दतीने तयार केलेले फुटपाथ, रस्ते खोदाईनंतर रस्ते पूर्ववत करताना रस्त्यांची सलगता न राखल्याने, मोठ्या प्रमाणात झालेल्या सिमेंट रस्ते, बहुतेक सर्व रस्त्यांवर जागो-जागी मोठ्या प्रमाणात पाणी साठले होते. परंतु यामुळे महापालिका प्रशासनाने पावसाळा पूर्व केलेली ड्रेनेज, नाले सफाई कामांचे पितळ उघडे पडले.
महापालिकेकडून प्रशासनाकडून दर वर्षी कोट्यवधी रुपये खर्च करुन शहरामध्ये पावसाळापूर्व कामे केली जातात. यामध्ये ओढे- नाले, ड्रेनेज सफाई, रस्त्यावरील पावसाचे पाणी वाहून नेणा-या नाल्यांमधील गाळ, कचरा काढणे, रस्ते, फुटपाथ दुरुस्ती आदी विविध स्वरूपाची कामे केली जातात. यंदा पावसाळापूर्व कामे शंभर टक्के पूर्ण केल्याचा पोकळ दावा प्रशासनानी केला होता. परंतु पहिल्याच आणि मुसळधार पावसाने प्रशासनाच्या कामांचे वाभाडे काढले. शहरामध्ये प्रामुख्याने कर्वे रस्त्यांवर, नदी पात्रामध्ये मेट्रोचे काम सुरु आहे. मेट्रोचे काम सुरु असलेल्या रस्त्यांवर प्रशासनाकडून पूर्णपणे दुर्लक्षच झाल्याचे गुरुवारी झालेल्या पावसामुळे स्पष्ट झाले. कर्वेरस्त्यावर डेक्कन येथील गरवारे शाळेच्या समोर एका बाजूचा संपूर्ण रस्ता पाण्याखाली गेला होता. येथील बस स्टॉप देखील पाण्याखाली गेल्याने नागरिकांना उभे राहणे देखील कठीणी झाले होते. तर प्रभात रस्त्यावर, लक्ष्मी रस्ता, डेक्कन परिसरामध्ये फुटपाथची कामे करताना ड्रेनेजची सुविधांचा अभाव, रस्ता व फुटपाथची उंची यामध्ये कोणतही सुसुत्रता व तांत्रिक बाबीचा विचार न केल्याने गल्ली-बोळांमध्ये रस्त्यांवर पाण्याची मोठी डबकी साठली होती. याशिवाय भवानी पेठ, दगडुशेठ गणपती चौक, भांडारकर रस्ता, कर्वे रस्ता, लॉ कॉलेट रोड, लक्ष्मी रोड, नदी पात्रातील रस्ता, नळस्टॉप, पर्वती रस्ता, आदी सर्व भागांत रस्त्यांवर मोठ मोठी तळीच्या तळी साठली होती. त्यात पाणी वाहून नेणाऱ्या नाल्याची योग्य सफाई न झाल्याने रस्त्यांवरून वाहनारे पाणी मोठ्या प्रमाणात थेट चौकांमध्ये येऊन वाहतुकीला प्रचंड अडथळा निर्माण करत होती. तर सिमेंट रस्त्यांमुळे पावसाचे संपूर्ण पाणी थेड ड्रेनेच लाईनमधून वाहत होते. यात ड्रेनेजच्या क्षमतेपेक्षा अधिक पाणी झाल्याने काही ठिकाणी ड्रेनेज लाईन फुट रस्त्यांवर पाणी येत होते. शहराच्या मध्यवस्तीत काही सोसायट्यांचे पार्किंग, दुकानांमध्ये रस्त्यांवरील पाणी शिरले. प्रशासनाच्या भोगळ कारभारामुळे पुणेकरांबरोबरच शहरामध्ये पालखीसोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या वारकऱ्यांचे देखील हाल झाले.