Save Trees: पुण्याच्या पेठांमध्ये झाडांचे प्रमाण कमी; उपनगरात सर्वाधिक, जाणून घ्या झाडांची आकडेवारी
By राजू हिंगे | Published: August 1, 2024 04:44 PM2024-08-01T16:44:48+5:302024-08-01T16:45:20+5:30
शहरात सर्वाधिक हिरवळीचा भाग सहकारनगर, धनकवडी असून, सर्वाधिक कमी वृक्षसंख्या भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत आहे
पुणे : शहरात तब्बल ५५ लाख ८१ हजार ५७८ वृक्ष आहेत. त्यापैकी सर्वाधिक झाडे धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत ११ लाख ९५ हजार ८९४ झाडे आहेत. सर्वात कमी म्हणजे १२ हजार ३४६ झाडे भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत आहेत. भवानीपेठ हा भाग जुन्या पुण्याचा असल्यामुळे तेथे वाडे-वस्त्यांचा भाग आहे. त्यामुळे तेथे वृक्षसंख्या कमी दिसते. शहरात वृक्षांच्या एकूण ४३० प्रजाती आढळल्या असून दुर्मीळ वृक्षांची संख्या १२४ नोंदवण्यात आली आहे. त्यात जुन्या वृक्षांची (हेरिटेज ट्री) संख्या २,८३८ आहे. पुणे महापालिकेच्या पर्यावरण अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
जिओग्राफिक इन्फर्मेशन सिस्टिम (जीआयएस) आणि ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम (जीपीएस) चा वापर करून प्रत्येक वृक्षाची माहिती, भौगोलिक स्थान, अक्षांश आणि रेखांश, प्रजाती, स्थानिक आणि शास्त्रीय नाव, व्यास, उंची, सद्यस्थिती याबाबत महापालिकेकडून सर्वेक्षण करण्यात आले. त्यानुसार शहरात ५५ लाख ८१ हजार ५७८ झाडे असल्याची नोंद झाली आहे. ही नाेंद १५ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत करण्यात आली असून, शहरात वृक्षांच्या एकूण ४३० प्रजाती आढळल्या आहेत. त्यात ७५ फॅमिलिज दिसतात. यात सर्वाधिक संख्या गिरीपुष्प या वृक्षांची आहे. याशिवाय दुर्मीळ वृक्षांची संख्या १२४ नोंदवण्यात आली असून, त्यात जुन्या वृक्षांची (हेरिटेज ट्री) संख्या २८३८ आहे.
साहजिकच वड हा सर्वात मोठे खोड असलेला वृक्ष म्हणून नोंदवला गेला आहे. शहरात सर्वाधिक हिरवळीचा भाग सहकारनगर, धनकवडी असून, सर्वाधिक कमी वृक्षसंख्या भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत आहे. भवानीपेठ हा भाग जुन्या पुण्याचा असल्यामुळे तेथे वाडे-वस्त्यांचा भाग आहे. त्यामुळे तेथे वृक्षसंख्या कमी दिसते. याशिवाय हडपसर, कोथरूड, नगररस्ता, शिवाजीनगर, औंध बाणेर या भागातील वृक्षसंख्या चार लाखांच्या पुढे आहे.
सन १९९५-९६ मध्ये पुण्यातील वृक्षसंख्या २८ लाख होती. २००७-०८ मध्ये ती ३६ लाख झाली आणि आताच्या गणनेनुसार ती ५५ लाखांच्या पुढे गेली आहे. देशी झाडे लावावीत, अशी जागृती केली जात आहे. २५ वर्षांपूर्वी वृक्ष संख्या कमी असल्याने वेगाने वाढणाऱ्या वृक्षांची लागवड करण्यात आली. अनेक बांधकाम व्यावसायिकांनीही हेच वृक्ष लावले. यामुळे आपल्याकडील पर्यावरणाला हानी होत असल्याचे लक्षात आल्याने त्याविरोधात जागृती झाली. त्यामुळे महापालिकेने देशी वृक्षांची यादी जाहीर करून वृक्ष वाटिकांमध्येही भारतीय प्रजातींची रोपे विक्रीसाठी ठेवली आहेत.
क्षेत्रीय कार्यालयनिहाय वृक्षांची संख्या
धनकवडी-सहकारनगर – ११ लाख ९५ हजार ८९४
हडपसर मुंढवा – ४ लाख ९९ हजार ७५७
कोथरूड बावधन – ४ लाख ८८ हजार ९६५
नगर रोड-वडगाव शेरी – ४ लाख ८६ हजार ०२५
शिवाजीनगर घोलेरोड – ४ लाख ७६ हजार ५४६
औंध बाणेर – ४ लाख ५८ हजार ६९५
ढोले पाटील रोड – २ लाख ८५ हजार ४६९
येरवडा कळस धानोरी – २ लाख ५६ हजार ४३०
कोंढवा येवलेवाडी – २ लाख २७ हजार २४८
वानवडी रामटेकडी – १ लाख ९७ हजार ४५९
वारजे कर्वेनगर – १ लाख ८९ हजार २४१
सिंहगड रस्ता – १ लाख ६४ हजार ०४५
बिबवेवाडी – १ लाख २९ लाख ८५६
कसबा विश्रामबाग – ३५ हजार ४२६
भवानी पेठ – १२ हजार ३४६