Police Bharti: पोलीस भरतीसाठी शुक्रवारपासून मैदानी चाचणी सुरु होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2021 05:06 PM2021-12-08T17:06:01+5:302021-12-08T17:06:09+5:30
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून शिपाई पदासाठी १९ नोव्हेंबरला लेखी परीक्षा घेण्यात आली होती
पिंपरी : पोलीस शिपाई पदाच्या ७२० जागांसाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. लेखी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, पुढील टप्पा म्हणून शुक्रवार, दि. १० डिसेंबरपासून मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे. राज्य राखीव बल गट क्रमांक २, वानवडी, हडपसर, पुणे येथे ही चाचणी होणार आहे. त्यासाठी ११ हजार ५३४ उमेदवार पात्र ठरले आहेत.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून शिपाई पदासाठी १९ नोव्हेंबरला लेखी परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर कट ऑफ जाहीर करून निकाल घोषित करण्यात आला. त्यात पात्र ठरलेल्या उमेदवारांची शारीरिक मोजमाप, कागदपत्र पडतावळी व मैदानी चाचणी होणार आहे. उमेदवारांनी आवेदन अर्जामध्ये नमूद केलेल्या सर्व मूळ व साक्षांकित केलेले कागदपत्र पासपोर्ट आकाराचे १० फोटो, तसेच शासनाकडून मिळालेल्या ओळखपत्रासह पहाटे साडेपाचला उमेदवारांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे. मैदानाच्या मुख्य प्रवेशदारातून प्रवेश देण्यात येणार असून, त्यासाठी बायोमेट्रिक पद्धतीचा वापर केला जाणार आहे. लेखी परीक्षेसाठीचे हाॅलतिकिट उमेदवारांकडे असावे. ही भरती प्रक्रिया सीसीटीव्ही /कॅमेऱ्यांच्या सर्व्हेक्षणाखाली होणार आहे.
मैदानी चाचणीचा दिनांक : १० ते २० डिसेंबर २०२१
महिला उमेदवारांची चाचणी : १७ व १८ डिसेंबर
माजी सैनिक उमेदवारांची चाचणी : २० डिसेंबर
ठिकाण : राज्य राखीव बल गट क्रमांक २, वानवडी, हडपसर, पुणे
वेळ : पहाटे ५.३० वाजतापासून