'त्या' बारा अधिकाऱ्यांची पदोन्नतीसाठी पुन्हा '' फिल्डींग ''
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 01:55 PM2019-03-29T13:55:27+5:302019-03-29T14:01:39+5:30
पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी) चे तत्कालीन अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी पदावनती केलेल्या बारा अधिकाऱ्यांना पुन्हा पदोन्नती देण्याचे प्रयत्न सुरू आहेत
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी) चे तत्कालीन अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी पदावनती केलेल्या बारा अधिकाऱ्यांना पुन्हा पदोन्नती देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी याबाबत प्रशासनाकडे विनंती अर्ज केले आहेत. त्यानुसार प्रशासनाकडून हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.
पीएमपीची २००७ मध्ये स्थापना झाल्यानंतर बारा अधिकाऱ्यांना सहा महिन्यांसाठी तात्पुरती पदोन्नती देण्यात आली होती. प्रशासकीय गरज म्हणून त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला होता. ही मुदत संपल्यानंतर संचालक मंडळाने संबंधित अधिकाऱ्यांना त्याच पदावर कायम केले. तत्कालीन अध्यक्ष आर. एन. जोशी यांनी या नियुक्ती बेकायदेशीर असल्याचे त्यावेळी नमुद केले होते. त्यानंतर राष्ट्रवादी कामगार युनियननेही या नियुक्त्या रद्द करण्याची सातत्याने मागणी केली. प्रत्येकवेळी नव्याने आलेल्या अध्यक्षांकडे युनियनकडून पाठपुरावा करण्यात आला. मुंढे यांनी यांनी याबाबतचे संचालक मंडळाचे निर्णय व प्रशासकीय नियमांची तपासणी करून सर्व बारा अधिकाऱ्यांची पदावनती करण्याचा निर्णय घेतला.
मुंढे यांनी २०१७ मध्ये या अधिकाऱ्यांना महामंडळ स्थापन होण्यापुर्वी असलेल्या पदांऐवजी दुसऱ्या पदांवर नियुक्ती केली. मुंढे यांची बदली झाल्यानंतर त्यांचे काही निर्णय बदलण्यात आले. आता पदावनतीचा हा निर्णयही बदलण्याबाबत प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्याचे समजते. मुंढे यांच्या बदलीला एक वर्ष पुर्ण झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी प्रशासनाकडे पुन्हा पूर्वीचे पद मिळण्यासाठी काही दिवसांपुर्वी विनंती अर्ज केले आहेत. २००८ मध्ये संचालक मंडळाने नियुक्त केलेल्या पदावरच पदोन्नती मिळावी, अशी मागणी या अधिकाऱ्यांनी केली आहे. पीएमपीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत प्रशासनाकडून अहवाल मागविला आहे. या अहवालानंतर संबंधित अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीवर निर्णय होणार आहे. त्यामुळे संबंधितांनी वरिष्ठांकडे फिल्डींग लावली असल्याची चर्चा पीएमपी वर्तुळात आहे.
-------------------------
... तर आंदोलन करू
संबंधित अधिकाऱ्यांनी पदोन्नतीसाठी अर्ज केले आहेत. तुकाराम मुंढे यांनी कायदेशीर बाबी तपासूनच त्यांची पदोन्नती रद्द केली आहे. युनियनने त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. आता पुन्हा त्यांना पदोन्नतीसाठी हालचाली सुरू आहेत. त्यांना पदोन्नती मिळाल्यास युनियनकडून पुन्हा आंदोलन केले जाईल.
- सुनिल नलावडे, सरचिटणीस
राष्ट्रवादी कामगार युनियन