शेताच्या बांधावर असतात ‘वड आणि पिंपळ’, पाठ्यपुस्तकात अजब तर्कट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 02:09 AM2017-08-20T02:09:41+5:302017-08-20T02:10:02+5:30
नववीच्या पाठ्यपुस्तकातील ‘दुपार’ या धड्यात शेतीच्या बांधावर वड आणि पिंपळाच्या झाडांच्या केलेल्या उल्लेखावरच स्वत: शेतकरी असलेल्या शिक्षकाने आक्षेप नोंदविला आहे. ही दोन्ही झाडे विशिष्ट शास्त्रीय कारणांमुळे बांधावर असत नाहीत, हे लेखकाला माहीत नाही, याची कीव करावीशी वाटते अशा शब्दांत त्यांनी टीका केली आहे.
पुणे : नववीच्या पाठ्यपुस्तकातील ‘दुपार’ या धड्यात शेतीच्या बांधावर वड आणि पिंपळाच्या झाडांच्या केलेल्या उल्लेखावरच स्वत: शेतकरी असलेल्या शिक्षकाने आक्षेप नोंदविला आहे. ही दोन्ही झाडे विशिष्ट शास्त्रीय कारणांमुळे बांधावर असत नाहीत, हे लेखकाला माहीत नाही, याची कीव करावीशी वाटते अशा शब्दांत त्यांनी टीका केली आहे.
यंदा नववीच्या बदललेल्या मराठी क्रमिक पुस्तकात लेखक राजीव बर्वे यांच्या ‘दुपार’ या धड्याचा समावेश आहे. यातील दुसºया परिच्छेदात ‘अशी ही दुपार होत असते. एखाद्या शेतावर त्या तळपत्या सूर्याला साक्षी ठेवून, सकाळपासून केलेल्या कामाचा शिणवटा घालविण्यासाठी प्रशस्त अशा वडाच्या नाही, तर पिंपळाच्या झाडाच्या सावलीत विसावलेला असतो कोणी शेतकरी,’ असा उल्लेख आहे. वानवडीच्या ह. ब. गिरमे विद्यालयातील शिक्षक मुकुंद वेताळ यांनीच याबाबत आक्षेप नोंदविला आहे. ‘लोकमत’शी बोलताना ते म्हणाले की, शेताच्या बांधावर किंवा कडेला अगदी आसपासही वडाचे आणि पिंपळाचे झाड असत नाही. वटवृक्षाच्या शाखा सभोवार विस्तारतात. पारंब्या जमिनीत रुजतात. बांधावरचा एकच वटवृक्ष अख्खे शेत खाऊन टाकील. पिंपळाच्या झाडावर रात्री पक्षी विसावतात. हे पक्षी बाजरी अथवा ज्वारीचे पीक खाऊन फस्त करू शकतात. म्हणून या दोन्ही झाडांचे स्थान गावकुसाबाहेर असते.
दुसरा आक्षेपार्ह भाग म्हणजे, धड्यातील ‘नांगरट’ हा शब्दप्रयोग. ही प्रक्रिया एकट्या माणसाने चालत नाही. नांगरणीसाठी कमीत कमी चार बैल आणि किमान दोन माणसे लागतात. शेतातल्या पेरणीपूर्व मशागतीत अनेक प्रक्रिया चालतात, त्यामुळे ‘नांगरणी’ऐवजी ‘औतकाठी’ हा शब्दप्रयोग करणे उचित होते. ‘नांगरणी’ या उल्लेखातून शेतात फक्त नांगरच चालतो, असा चुकीचा संदेश जातो. म्हणून हा धडा पाठ्यपुस्तकातून रद्द केला जावा, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
हा धडा ललित लेखन प्रकारात मोडतो. लेखकाला शास्त्रीय कारणे माहीत असायला हवीत, असे काही नसते.
- राजीव बर्वे, लेखक