जुन्नर तालुक्यात अवकाळीमुळे शेतांचे नुकसान; वादळी वाऱ्यासह झालेल्या उन्हाळी पिके भूईसपाट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 12:51 IST2025-04-14T12:51:32+5:302025-04-14T12:51:42+5:30
नुकसान झालेल्या सर्व पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी माळशेज परिसरातील शेतकरी शासनाकडे करत आहे

जुन्नर तालुक्यात अवकाळीमुळे शेतांचे नुकसान; वादळी वाऱ्यासह झालेल्या उन्हाळी पिके भूईसपाट
ओतूर (जुन्नर) : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचंड उकाड्यानंतर जुन्नर तालुक्यातील माळशेज परिसराला अवकाळी पावसाने झोडपले. सायंकाळी मोठ्या आवाजात भितीलायक विजांचा लखलखाट आणि ढगांचा गडगडाटासह वादळी वाऱ्यासह वळीव पावसाने हजेरी लावून शेतकऱ्यांची धांदल उडवली. माळशेज परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे उन्हाळी टोमॅटो, गहू, कांदे, बाजरी,काकडी, धना आदी पिके भूईसपाट झाली असून, इतर शेती पिकांचे देखील मोठ्या प्रमणावर नुकसान झाले. डिंगोरे, मढ, पारगाव, वाटखळे, पिंपळगाव जोगा शिवारात अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने या भागातील नुकसानीच आकडा मोठा आहे. शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा आस्मानी संकट कोसळले आहे.
रविवारी अवकाळी पावसाचा जोर परिसरात अधिक होता. दुपारी ४.३० वाजता पावसाला अचानक सुरुवात झाली ५.३० पर्यंत पाऊस सुरू होता. यावेळी वाऱ्याचा वेग अधिक असल्याने धुळीचा लोट आकाशात उडत होते. अहिल्यानगर कल्याण राष्ट्रीय महामार्गावर पिंपळगाव जोगा व कोळवाडी या हद्दीत झाडे पडली. कित्येक तास रस्ता बंद होता. शासकीय यंत्रणा लवकर न आल्याने वाटसरू रस्ता मोकळा करत असल्याचे निदर्शनास आले.
अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना मात्र मोठा फटका बसला आहे. एक तास झालेल्या पावसाने परिसरास अक्षरशः झोडपले त्यात आंब्याचे, आमराईंचे मोठे नुकसान झाले. काही ठिकाणी घराची कवले तसेच पत्रे उडाले, वीट भट्ट्यांचे देखील नुकसान झाले. उन्हाळी कांदा काढणी केलेल्या कांद्याच्या आरणी खालून पाणी गेले व काढणीला आलेल्या कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले. नुकसान झालेल्या सर्व पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी माळशेज परिसरातील शेतकरी शासनाकडे करत आहे.