राजगुरुनगरात कापड दुकानाला भीषण आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:10 AM2021-07-08T04:10:01+5:302021-07-08T04:10:01+5:30
राजगुरुनगर: राजगुरुनगर येथील पुणे उत्तर जिल्ह्यातील प्रसिद्ध संगम कापड दुकानास शॉटसर्किट झाल्याने दि. ७ रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास ...
राजगुरुनगर: राजगुरुनगर येथील पुणे उत्तर जिल्ह्यातील प्रसिद्ध संगम कापड दुकानास शॉटसर्किट झाल्याने दि. ७ रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्यामुळे कापड दुकानाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. अखेर साडेतीन तासाने अग्निशामक दलाने वाढत्या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविले. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही.
राजगुरुनगर शहरात वाडा रोडलगत संगम कपड्याचे दुकान आहे. दुकानाचे नूतनीकरणाचे काम सुरू होते. दुपारी ४ वाजता दुकान कोरोनाच्या प्रार्शभूमीवर दुकान बंद करण्यात आले होते. साडेचार वाजण्याच्या सुमारास शार्टसर्किट होऊन दुकानाला आग लागली. काही कळण्याच्या आत आगीने रौद्ररूप धारण केले होते. राजगुरुनगर नगर परिषदेचा अग्निशामक बंब घटनास्थळी येऊन आग विझविण्याचे प्रयत्न केले. मात्र आग भडकत होती. दरम्यान लागलेल्या आगीवर नियत्रंण मिळविण्यासाठी प्रशासनाने
चाकण नगर परिषेदचा व खेड एमआयडीसीतील अग्निशामक बंब बोलविण्यात आला होता. मात्र आग नियंत्रणात आली नाही. कापड दुकानाच्या तिसऱ्या मजल्याने मोठ्या प्रमाणात पेट घेतला होता. अखेर ७ वाजता पुणे येथून अग्निशामक बंब आला, अर्धा तासात तिसऱ्या मजल्यावरील आग नियंत्रणात आणण्यात यश आले.
प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण, खेड पोलीस निरीक्षक सतीश गुरव, नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रकाश पाटील, नायब तहसीलदार राजेश कानसकर, राजगुरुनगरचे माजी सरपंच प्रदीप कासवा व राजगुरुनगर शहरातील व्यापारी, नागरिक, आगीवर नियत्रंण मिळविण्यासाठी प्रयत्न करीत होते.
फोटो ओळ: राजगुरुनगर येथे कापड दुकानाला आग लागली होती. पुणे येथील अग्निशामक दलाने ४ तासांनंतर आगीवर नियत्रंण मिळवले.
--
मोबाईल शूटिंग काढणाऱ्यांच्या गर्दीने मदत कार्यात अडथळ
--
दुपारी लागलेल्या आगीमुळे शहरात धुराचे लोट पसरल्याचे दूरवरून दिसत होते. त्यामुळे नागरिकांनी घटनास्थळी प्रचंड गर्दी केली. लॉकडाऊन असल्यामुळे इतर दुकाने बंद होती. त्यामुळे घटनास्थळी अग्निशामक बंब व पोलीस लागलीच पोहोचले. बघ्यांची गर्दी व मोबाईलवर ती फोटो, शूटिंग करणारे उत्साही नागरिक यामुळे मदतकार्यात अडथळे निर्माण होत होते. सुमारे ४ तास शहरातून जाणारा वाड्याला जाणारा रस्ता बंद करण्यात आला होता. त्यामुळे प्रवाशांना पायी जावे लागले.