पुण्यात कुमठेकर रस्त्यावरील मुलींच्या वसतिगृहात भीषण आग, एकाचा गुदमरून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2024 09:56 AM2024-06-07T09:56:32+5:302024-06-07T09:57:43+5:30
दरम्यान आग लागली त्यावेळी या इमारतीत ४८ मुली राहत होत्या. तळमजल्यावर आग लागल्याने मोठ्या प्रमाणात धुराचे लोट तयार झाले होते...
- किरण शिंदे
पुणे : पुणे शहरातील कुमठेकर रस्त्यालगत असणाऱ्या एका चार मजली इमारतीला शुक्रवारी मध्यरात्री भीषण आग लागली. या भीषण आगीत गुदमरून एकाचा मृत्यू झाला. राहुल कुलकर्णी (वय अंदाजे ४५) असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर इमारतीत अडकलेल्या ४८ मुलींची सुटका करण्यात आली.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, कुमठेकर रस्त्यालगत एका चार मजली इमारतीत खाजगी शैक्षणिक इन्स्टिट्यूट आहे. या इमारतीत खालच्या मजल्यावर अभ्यासिका, दुसऱ्या मजल्यावर स्टडी रूम आणि इतर दोन मजल्यावर या इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान गुरुवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास या इमारतीला भीषण आग लागली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी अवघ्या काही मिनिटात आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.
दरम्यान आग लागली त्यावेळी या इमारतीत ४८ मुली राहत होत्या. तळमजल्यावर आग लागल्याने मोठ्या प्रमाणात धुराचे लोट तयार झाले होते. त्यामुळे या इमारतीत राहणाऱ्या मुलींनी टेरेसवर धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी या सर्व मुलींना शेजारील इमारतीवरून शिडीच्या सहाय्याने बाहेर काढले. बचाव कार्य संपल्यानंतर याच इमारतीत राहणारा सागर कुलकर्णी मिसिंग असल्याचे लक्षात आले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी या इमारतीत पुन्हा शोधमोहीम सुरू केली. काही वेळातच त्यांना एका खोलीत सागर बेशुद्ध अवस्थेत आढळला. त्यानंतर त्याला तातडीने नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
अग्निशमन दलाचे कसबा विभागाचे प्रभारी अधिकारी कमलेश चौधरी, स्टेशन ऑफिसर संजय रामटेके, चालक संदीप थोरात, फायरमन सतीश ढमाले, सुमित दळवी, मदतनीस शुभम देशमुख आणि त्यांच्या टीमने या आगीवर नियंत्रण मिळवले.