पंधरा वर्षीय चेलुवी ढोकलेने कमळजाई सुळका केला सर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:10 AM2021-01-22T04:10:14+5:302021-01-22T04:10:14+5:30
जुन्नर तालुक्यातील जीवधन- नाणेघाट भागातील फांगुळ गव्हाण गावानजीक कमळजाई- नीरा या सुमारे १३० फूट उंच सुळक्यावर एव्हरेस्टवीर कृष्णा ढोकले ...
जुन्नर तालुक्यातील जीवधन- नाणेघाट भागातील फांगुळ गव्हाण गावानजीक कमळजाई- नीरा या सुमारे १३० फूट उंच सुळक्यावर एव्हरेस्टवीर कृष्णा ढोकले यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी-चिंचवड माऊंटेनिअरिंग क्लबच्या चौदा गिर्यारोहकांनी एकाचवेळी दोन बाजूने चढाई करण्याची दुहेरी मोहीम आयोजित केली होती. त्यात चेलुवीने नवीन मार्ग खुला करत ही कामगिरी केली. अवघ्या दोन तासात पिटोन, मेखा, व इतर नैसर्गिक साधनांचा वापर करून चढाई पूर्ण केली. तर दुसऱ्या व पारंपरिक मार्गावरून गौरव लंघे याने चढाईला सुरुवात केली.
पहिल्या पंचेचाळीस फूट चढाईनंतर सचिन शहा याने चढाई केली आणि सुळक्याचा माथा गाठला.
माऊंट एव्हरेस्ट व कांचनगंगा शिखरवीर कृष्णा ढोकले यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी-चिंचवड माऊंटेनिअरिंग क्लबच्या संघाने ही कामगिरी केली. मोहिमेत चेलुवी ढोकले, गौरव लंघे, धनराज साळवी, सचिन शहा, ओंकार बुरडे, सुरेश पाटील, ओम पाटील, हरीश पाटील, हिमांशू ढोकले, रुद्राक्षी मोहिते, मालोजी ढोकले, शिवम पाटील, स्वयम पाटील आदींनी सहभाग घेतला.
चेलुवीने या आधी तैलबैला, काळकराई, लिंगाणा सुळका, तसेच सिंहगडावर यशस्वी चढाई केलेली आहे. त्याचबरोबर राज्यस्तरीय व राष्ट्रीय गिर्यारोहण स्पर्धेत यश मिळवून २०१८ साली बँकॉक येथे झालेल्या आशियाई कृत्रिम प्रस्तरारोहन स्पर्धेसाठी भारताकडून तिची निवड झाली होती.
२१ शेलपिंपळगाव कमळजाई
कमळजाई सुळक्यावर यशस्वीपणे चढाई केल्यानंतर आनंदोत्सव साजरा करताना माऊंटेनिअरिंग क्लबचे सदस्य.