पाचवी, आठवी शिष्यवृत्ती परीक्षेची उत्तरसूची जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:15 AM2021-08-25T04:15:49+5:302021-08-25T04:15:49+5:30
पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे १२ आॅगस्ट रोजी घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षेची अंतरिम (तात्पुरती) ...
पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे १२ आॅगस्ट रोजी घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षेची अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची मंगळवारी करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना २४ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या कालावधीत या उत्तरसूचीवर आक्षेप नोंदविण्यासाठी अशी मुदत देण्यात आली आहे.तसेच येत्या सप्टेंबर अखेरपर्यंत शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे,असे राज्य परीक्षा परिषदेच्या अधिका-यांनी सांगितले.
राज्यात मुंबई वगळता सर्व जिल्ह्यात यंदा पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली.पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ३ लाख ८८ हजार ४०५ विद्यार्थ्यांनी,तर आठवीच्या परीक्षेसाठी २ लाख ४४ हजार २६० विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती.परीक्षेसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची राज्यातील ५ हजार ६८७ केंद्रावर परीक्षा घेण्यात आली.या परीक्षेस सुमारे ९० टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि राज्यातील पूरस्थितीचा विचार करून सुमारे चार वेळी शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती.अखेर १२ ऑगस्ट रोजी परीक्षा घेण्यात आली.या परीक्षेची उत्तरसूची (अन्सर की) राज्य परीक्षा परिषदेने मंगळवारी जाहीर केले.
अंतरिम उत्तरसूचीवर आक्षेप ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. विद्यार्थी व पालक संकेतस्थळावर व शाळांच्या लॉगीनमध्ये आक्षेपाचे निवेदन पाठवू शकतात. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचे नाव, आडनाव, आई-वडिलांचे नाव, शहर याबाबत दुरूस्ती करण्यासाठी शाळांना २४ ऑगस्ट ते २ सप्टेंबर असा कालावधी देण्यात आला असे राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी सांगितले.