पाचवी फेरी; प्रवेशप्रक्रिया सुरू
By admin | Published: July 29, 2016 03:52 AM2016-07-29T03:52:16+5:302016-07-29T03:52:16+5:30
अकरावी आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेत सहभागी न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पाचवी प्रवेश फेरी राबविली जात असून विद्यार्थ्यांना येत्या शुक्रवारपासून माहिती पुस्तिका
पुणे : अकरावी आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेत सहभागी न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पाचवी प्रवेश फेरी राबविली जात असून विद्यार्थ्यांना येत्या शुक्रवारपासून माहिती पुस्तिका विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. दुसऱ्या प्रवेश फेरीच्या कट आॅफ पेक्षा जास्त गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांनाच या फेरीतून प्रवेश मिळणार आहेत, असे शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
अकरावी प्रवेशावरून विद्यार्थी व पालकांचा गोंधळ सुरू असला तरी शिक्षण विभागातर्फे प्रसिध्द करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसारच प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यामुळे अद्याप ज्या विद्यार्थ्यांनी आॅनालाईन प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी अर्जच केला नव्हता, अशा विद्यार्थ्यांना माहिती पुस्तिका, लॉग इन आयडी व पासवर्ड दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांना शहरातील हुजूरपागा व हडपसर येथील एस.एम.जोशी विद्याद्यालयात आणि आकुर्डी येथील गोदावरी हिंदी विद्यालयातून १०० रुपये भरून माहिती पुस्तिका विकत घेता येईल. ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी आॅनलईन अर्ज भरला आहे.त्यांना माहिती पुस्तिकेची विक्री केली जाणार नाही.तसेच अशा विद्यार्थ्यांना पुन्हा आॅनलाईन अर्ज भरता येणार नाही. मात्र, अर्धवट अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांनी पुन्हा माहिती पुस्तिका विकत घेण्याची गरज नाही.
या फेरीसाठी विद्यार्थ्यांना कमीत कमी ५ व जास्तीत जास्त १५ कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम देता येणार आहेत.(प्रतिनिधी)
अकरावीला कोणाला मिळणार प्रवेश
पाचव्या आॅनलाइन प्रवेश फेरीतून दुस-या आॅनलाईन प्रवेश फेरीच्या कट आॅफ पेक्षा जास्त गुण मिळविणा-या विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयात प्रवेश दिले जातील. त्यामुळे विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांचे पसंतीक्रम टाकताना संबंधित महाविद्यालयाचा दुस-या यादीचा कट आॅफ किती होता. हे तपासून मगच प्रवेश अर्जात महाविद्यालयांचे पसंतीक्रम टाकावेत. विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर कट आॅफ ची माहिती उपलब्ध करून दिली जाईल,असे सहायक शिक्षण संचालक मीनाक्षी राऊत यांनी सांगितले.