बीआरटीएससाठी पाचव्यांदा मुहूर्त
By admin | Published: August 25, 2015 04:47 AM2015-08-25T04:47:11+5:302015-08-25T04:47:11+5:30
बीआरटीएस सुरू करण्याविषयी आज महापालिकेत बैठक झाली. दि. ५ सप्टेंबरपासून बससेवा सुरू करण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. शहरातील पहिल्या
पिंपरी : बीआरटीएस सुरू करण्याविषयी आज महापालिकेत बैठक झाली. दि. ५ सप्टेंबरपासून बससेवा सुरू करण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. शहरातील पहिल्या बीआरटीएस मार्गाचा पाचव्यांदा मुहूर्त काढण्यात आला आहे. हा मुहूर्त तरी गाठला जाईल का, अशी चर्चा महापालिकेत आहे.
महापालिका भवनात महापौर शकुंतला धराडे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली. या वेळी महापालिका आयुक्त राजीव जाधव, स्थायी समितीचे अध्यक्ष अतुल शितोळे, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, विरोधी पक्षनेते विनोद नढे, शिवसेनेच्या गटनेत्या सुलभा उबाळे, मनसेचे अनंत कोऱ्हाळे, सहशहर अभियंता राजन पाटील, बीआरटीएसचे प्रवक्ते विजय भोजने, पीएमपीच्या मयूरा शिंदेकर आदी उपस्थित होते.
बैठकीच्या सुरुवातीला आयुक्त जाधव यांनी बीआरटीएसच्या कामांची माहिती दिली. महापालिकेची अंतिम तयारी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले, तर औंध-रावेत बीआरटीएस कॉरिडॉरला जोडणारे एकूण ११ मार्ग असल्याने सुमारे १३० बसगाड्यांवर आयटीएमएस यंत्रणा बसविण्याचे काम लवकरच पूर्ण होईल, असे शिंदेकर यांनी सांगितले. अर्धवट कामे जादा कर्मचारी लावून पूर्ण करावीत. जलदगतीने बीआरटीएस गाडी प्रायोगिक तत्त्वावर सुरूकरावी आणि ५ सप्टेंबरपासून पूर्ण क्षमतेने बीआरटीएस सुरू करावी, अशी सूचना महापौर धराडे यांनी केली.
आजपर्यंत अनेकदा बीआरटीबाबत झालेल्या बैठकीत नुसतीच चर्चा झाली आहे. प्रत्येक वेळी प्रशासनाने दिरंगाईची कारणे दिली आहेत. (प्रतिनिधी)
मुहूर्त गाठणार का?
गेल्या सहा वर्षांपासून बीआरटी प्रकल्पाची चर्चा आहे. मार्गांचे काम सुरू झाले असले, तरी शहरातील कोणताही मार्ग सुरू झालेला नाही. मार्च, जुलैमध्ये, त्यानंतर १ आॅगस्ट, १५ आॅगस्ट असे मुहूर्त काढले. महापालिका अधिकारी, ठेकेदार यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याने अजूनही बीआरटीएसला मुहूर्त सापडलेला नाही. पाचव्यांदा मुहूर्त काढण्यात आला आहे. औंध-रावेत या मार्गावर बीआरटीएस सुरू होणार असून, त्यासाठी बससेवेची चाचणी घेतली जाणार आहे. ५ सप्टेंबरला माजी उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते बससेवेचे अधिकृत उद्घाटन होणार आहे. हा मुहूर्त गाठण्यात प्रशासनास यश मिळेल का, अशी चर्चा महापालिकेत होती.