टँकरच्या आकड्याने केली पन्नाशी पार, दुष्काळ होतोय तीव्र
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2019 01:47 AM2019-01-26T01:47:58+5:302019-01-26T01:48:11+5:30
जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत आहे. पाण्याच्या मागणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे.
पुणे : जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत आहे. पाण्याच्या मागणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. पुणे जिल्ह्यातील ३० गावे आणि जवळपास ३२४ वाड्या वस्त्यांवर ५१ टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. यात शिरूर तालुक्यात सर्वाधिक १७ तर बारामती तालुक्यात १६ टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. जानेवारी महिन्यातच ही भिषण परिस्थीती असून येत्या काळात टँकरच्या मागणीत आणखी वाढ होणार आहे. वाढत्या उष्णतामानाने दुष्काळाची तिव्रताही वाढणार आहे.
यावर्षी पावसाळ्यात चांगला पाऊस झाला. तर काही ठिकाणी अल्पवृष्ठी झाल्याने या वर्षी दुष्काळाची तिव्रता दिवसेंदिवस वाढत आहेत. सातत्याच्या विसर्गामुळे धरणेही तळ गाठत आहे. यामुळे जिल्ह्यात पाण्यासाठी नागरिकांना भटकंतीकरावी लागत आहे. अनेक गावात टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. जानेवारीतच टँकरची संख्या ही ५० च्या वर गेली आहे. सध्या ३० गावे आणि ३२४ गावांत टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. ही परिस्थिती कशा पद्धतीने हाताळायची, याबाबत प्रशासनातही चिंता वाढू लागली आहे. दुष्काळ निवारणासाठी जिल्हा परिषदेत विशेष कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. टंचाईची अनेक कामे मंजुर करण्यात आली असून त्या त्वरित सुरू करण्याच्या सुचना ही देण्यात आल्या आहे. जिल्हा प्रशासनातर्फे तसेच जिल्हा परिषदेतर्फे ठिकठिकाणी टंचाई आढावाच्या बैठका घेण्यात येत आहे. वाढत्या उन्हामुळे जिल्ह्यात टँकरची मागणीही वाढली आहे.
बारामती, दौंड, इंदापुर पुरंदर आणि शिरूर तालुक्याला दुष्काळाची झळ मोठ्या प्रमाणात बसत आहे. सध्या शिरूर तालुक्यात १७ टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. त्या पाठोपाठ बारामती तालुक्यात १६ टॅकर तर दौंड तालुक्यात ७ टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. अजुन पावसासाठी पाच महिने बाकी असून या दरम्यान दुष्काळाची भिषणता वाढणार आहे. भविष्यात टँकरच्या मागणीत मोठी वाढ होणार आहे.