पुणे शहरात पावणेचार लाख नागरिक ‘बूस्टर’च्या प्रतीक्षेत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 09:52 AM2022-07-14T09:52:44+5:302022-07-14T09:53:29+5:30
येत्या शुक्रवारपासून शहरातील महापालिकेच्या ६८ लसीकरण केंद्रावर मिळणार डोस...
पुणे : सरकारी लसीकरण केंद्रांमध्ये शुक्रवार (दि. १५) पासून १८ ते ५९ वर्षे वयोगटातील नागरिकांना माेफत बुस्टर डोस दिला जाईल, असे केंद्र सरकारने घोषित केले आहे. यानुसार पुणे शहरात या वयाेगटातील पावणेचार लाख नागरिक पात्र असून, त्यांना येत्या शुक्रवारपासून शहरातील महापालिकेच्या ६८ लसीकरण केंद्रांवर हा डाेस मिळू शकणार आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवीवर्षानिमित्त १५ जुलैपासून पुढील ७५ दिवस हे बुस्टर डाेस माेफत मिळणार आहेत. शहरातील पालिकेच्या लसीकरण केंद्रांवर ही लस काेविन ॲपवर ऑनलाइन पध्दतीने नाेंदणी करून किंवा प्रत्यक्ष लसीकरण केंद्रांवर जाऊनही घेता येणार आहे. या केंद्रांवर कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसींचे डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
याआधी १८ ते ५९ वयाेगटात बुस्टर डाेस हा हेल्थकेअर वर्कर, फ्रंटलाईन वर्कर व ६० वर्षांपुढील नागरिक वगळता इतरांना सशुल्क हाेता. शहरात आतापर्यंत ३८ लाख लोकांनी पहिला डोस घेतला आहे. १८ वर्षांपुढील ५ लाख २४ हजार ४९२ नागरिकांचा दुसरा डोस, तर ३ लाख ८६ हजार ७ जणांचा तिसरा डोस घेणे बाकी आहे.
शहरातील संख्या
- १८ वर्षांपुढील नागरिक : ४२ लाख १० हजार
- पात्र लाभार्थी : ३१ लाख ३० हजार
- पहिला डोस पूर्ण : ३७ लाख १६ हजार (१११ टक्के)
- दुसरा डोस पूर्ण : ३१ लाख ४२ हजार (९४ टक्के)
- बुस्टर डोस : ३ लाख ५९ हजार
नागरिकांनी महापालिकेच्या लसीकरण केंद्रांमध्ये जाऊन प्राधान्याने लसीकरण करून घ्यावे. दुसरा डोस घेऊन ६ महिने किंवा २६ आठवडे पूर्ण झालेल्या १८ वर्षांवरील नागरिकांना कोव्हिशिल्ड किंवा कोव्हॅक्सिनचा तिसरा डोस घेता येणार आहे.
- डॉ. सूर्यकांत देवकर, लसीकरण अधिकारी, पुणे महापालिका