छप्पन्न वर्षीय विद्यार्थिनीची उत्तुंग भरारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:15 AM2021-06-16T04:15:54+5:302021-06-16T04:15:54+5:30

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून एम. ए. मराठीसाठी चक्क ५६ वर्षीय विद्यार्थिनीला चार सुवर्णपदके मिळाली आहेत. कला, साहित्य ...

Fifty-six year old student's great flight! | छप्पन्न वर्षीय विद्यार्थिनीची उत्तुंग भरारी!

छप्पन्न वर्षीय विद्यार्थिनीची उत्तुंग भरारी!

Next

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून एम. ए. मराठीसाठी चक्क ५६ वर्षीय विद्यार्थिनीला चार सुवर्णपदके मिळाली आहेत. कला, साहित्य आणि लेखनाची आवड असणाऱ्या पुण्यातील नीलिमा फाटक यांचे सर्वच स्तरावर कौतुक होऊ लागले आहे.

सामान्यत: वयाच्या ३० वर्षांपर्यंतच शिक्षण घेतले जाते. त्यांनतर नोकरी, व्यवसायात गुंतल्यावर पुन्हा शिक्षणाकडे शक्यतो वळत नाहीत. पण फाटक यांनी शिक्षण पूर्ण झाल्यावर, बँकेत ३० वर्षे नोकरी करून एम. ए. मराठीला प्रवेश घेतला. त्यामध्ये मन लावून अभ्यास करत चार सुवर्णपदके मिळवण्याची उत्तम कामगिरी करून दाखवली आहे.

फाटक यांनी रामकृष्ण मोरे आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स या महाविद्यालयात वाणिज्य शाखेची पदवी प्राप्त केली. त्यानंतर वकिलीचे शिक्षणही केले. त्यांना आधीपासूनच काव्यलेखन, साहित्य वाचनाची आवड होती. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर त्या बँकेत नोकरीसाठी रुजू झाल्या. पण त्यांनी आपले लिखाण, वाचन, कवितालेखन हे छंद थांबवले नाहीत. कामातून वेळ मिळाला की त्या साहित्यात गुंतून जात असत. कविता लिहिण्याचा छंद कधीही थांबू दिला नाही. अखेर त्याचे फळ म्हणून २०१९ मध्ये ‘नीलमाधव’ नावाचा कवितासंग्रह प्रकाशित झाला. जपानमध्ये १८ व्या आंतरराष्ट्रीय परिषदेत या संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. तेव्हाच करम व रंगत-संगत प्रतिष्ठानच्या वतीने त्यांना पारंपरिक व उच्चशिक्षण पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. समाजकार्य म्हणून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांचे संगोपन करत असलेल्या स्नेहवन संस्थेशी त्या संलग्न आहेत. फाटक म्हणाल्या की, महाविद्यालयीन शिक्षणानंतर बँकेत नोकरीला लागले. पण एम. ए. मराठी करण्याचे ठरवले होते. नोकरीच्या ३० वर्षांमध्ये मराठी साहित्याकडे अजिबात दुर्लक्ष केले नाही. एका बाजूने लेखनकार्य सातत्याने चालू होते. त्याचेच फळ म्हणून आता मला पुणे विद्यापीठातून चार सुवर्णपदके मिळाली आहेत. पीएच.डी. करण्याची माझी इच्छा आहे. आताच मी सेट परीक्षा उत्तीर्ण झाले आहे. विद्यापीठात पीएच.डी.साठी प्रवेशही घेतला आहे.

मॉरिशसमधील अभ्यासक्रमात कविता

तीस वर्षे स्टेट बँकेत नोकरी केली. त्यानंतर वयाच्या ५४ व्या वर्षी स्वेच्छानिवृत्ती घेतली. शालेय जीवनापासूनच मला वाचन आणि कविता लेखनाची आवड होती. महाविद्यालयीन जीवनातही मी लेखन थांबवले नाही. माझी एक कविता मॉरिशसमधील इयत्ता नववीच्या मराठी अभ्यासक्रमात आहे.

फोटो- नीलिमा फाटक

Web Title: Fifty-six year old student's great flight!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.