बारामतीतील अंजिर शेती राज्यातील बळीराजांसाठी ठरली 'रोल मॉडेल'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2020 06:14 PM2020-12-26T18:14:47+5:302020-12-26T18:16:44+5:30

राज्यभरातून अनेक शेतकरी निंबूत येथे जगताप बंधूंकडून अंजिर शेतीचे धडे घेत आहेत.

Fig farming in Baramati becomes role model for victims in the state | बारामतीतील अंजिर शेती राज्यातील बळीराजांसाठी ठरली 'रोल मॉडेल'

बारामतीतील अंजिर शेती राज्यातील बळीराजांसाठी ठरली 'रोल मॉडेल'

Next

रविकिरण सासवडे -
बारामती : शेतकरी स्वत: मोठा संशोधक असतो असे म्हंटले जाते. कष्ट, जिद्द आणि संशोधनवृत्ती अंगी असेल तर शेतकरी आपल्यासोबत इतरांना देखील मार्गदर्शक ठरू शकतो. बारामती तालुक्यातील निंबूत गावच्या जगताप बंधूंची अंजिर शेती राज्यातील शेतकऱ्यांना रोड मॉडेल ठरली आहे.

राज्यभरातून अनेक शेतकरी निंबूत येथे जगताप बंधूंकडून अंजिर शेतीचे धडे घेत आहेत. निंबुत येथे दीपक जगताप व गणेश जगताप यांनी २००८ साली अंजिर बागेची लागवड केली. अंजिर लावत असतानाच या बागेच्या व्यवस्थापनातील बारकावे त्यांनी अभ्यासाला सुरूवात केली. त्यातूनच एका एकरावर असणारी अंजिर बाग ६ एकरापर्यंत वाढवली. मागील वर्षी व यंदाच्या वर्षी देखील अती पावसाने अंजिराचे आगार असणाऱ्या पुरंदर तालुक्यातील ७० ते ८० बागांचे नुकसान झाले. करपा आणि तांबेरा या प्रमुख रोगामुळे अनेक अंजिर बागा उद्धवस्त झाल्या. मात्र जगताप बंधूंनी बागेचे केलेले योग्य व्यवस्थापन यामुळे तांबेरा व करपा हे रोग त्यांच्या बागेकडे फिरकले देखील नाहीत. जगताप यांच्या अंजिर बागेमध्ये खट्टा व मिठा असे दोन्ही बहार घेतले जातात. बाजारपेठेचा असलेला अभ्यास आणि फळांची गुणवत्ता यामुळे जगताप यांच्या बागेतील अंजिर एक महिना लवकर मिरज, सांगली, कोल्हापूरच्या बाजारात दाखल होते. बाजारपेठेचा अभ्यास करून बागेचे नियोजन केले जाते. त्यामुळे अंजिर फळांना चांगला दर देखील मिळतो.जगताप यांच्या अभ्यास व संशोधनाचा फायदा इतर शेतकऱ्यांना व्हावा यासाठी २०१७ साली शासनाने अखिल महाराष्ट्र अंजिर उत्पादक संशोधक संघाच्या संचालक पदी त्यांची नियुक्ती केली. तर २०१८ साली  दीपक जगताप यांना राज्य शासनाने अंजिर रत्न पुरस्काराने सन्मानित केले. बागेच्या व्यवस्थापनासाठी निंबुत येथील कृषि सहायक प्रविण माने यांचे देखील जगताप बंधूना सहकार्य होत आहे.


- एका एकरामध्ये २०० अंजिर झाडांची लागवड
- दोन वर्षानंतर फळ धरण्यास सुरूवात
- सुरूवातीला २५ ते ३० किलो एका झाडापासून उत्पादन
- बाग दहा वर्षांची झाल्यानंतर एका झाडापासून १०० ते १२५ किलो उत्पादन
- जुनमध्ये खट्टा बहार तर सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये मिठा बहार धरला जातो.
- पूर्ण वाढ झालेल्या बागेपासून एकरी २० टनापर्यंत उत्पादन
- सरासरी ६० ते ६५ रूपये किलो दर मिळतो.

शेतीमध्ये परवडत नाही, असे म्हणून चालणार नाही. शेतकऱ्यांनी स्वत: अभ्यासक व्हायला हवे. माझा बंधू गणेश याला पुण्यामध्ये महिना २५ हजार पगाराची नोकरी होती. मात्र आज तो नोकरी सोडून पूर्णवेळ शेती करतो.  शेती नफ्यामध्ये आणता येते. त्यासाठी आपल्या शेतीचा अभ्यास, तज्ज्ञांचे मार्गदर्शन व बाजारपेठेचे नियोजन शेतकऱ्यांनी करायला हवे.
- दीपक जगताप, अंजिर रत्न पुरस्कार प्राप्त शेतकरी, (निंबुत, ता. बारामती)

 प्रतिकुल परिस्थितीमध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग करत जगताप बंधूंनी उभी केलेली अंजिर शेती इतर शेतकऱ्यांना प्रेरणादायी आहे.
- दत्तात्रय पडवळ,तालुका कृषि अधिकारी, बारामती
... 
पुरंदर तालुक्याच्या लगत असणाऱ्या बारामतीच्या जिरायती भागातील शेतकऱ्यांनी अंजिर शेतीकडे वळायला हवे. यासाठी जगताप यांच्या अंजिर शेती त्यांच्यासाठी मार्गदर्शक ठरेल.
- बालाजी ताटे, उपविभागिय कृषि अधिकारी, बारामती

Web Title: Fig farming in Baramati becomes role model for victims in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.