'महापौरांशी असं बोलू नका, मग तुम्ही क्लास घ्या' नगरसेविकांची सभागृहात चकमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 05:54 PM2018-06-28T17:54:58+5:302018-06-28T17:56:14+5:30
गुरुवारी झालेल्या वादळी सभेत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविकांमध्ये शाब्दिक चकमक बघायला मिळाली. महापौरांशी असे बोलू नका, मग तुम्ही क्लास घ्या कसे बोलायचे ते अशा सवाल जवाबात महापालिकेची सर्वसाधारण सभा महिला सभासदांनी गाजवली.
पुणे : पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत वादाचे प्रसंग निर्माण होणे नवीन नाही. मात्र त्यात बहुतांश वेळात महिला नगरसेविकांचा समावेश नसतो. मात्र, गुरुवारी झालेल्या वादळी सभेत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविकांमध्ये शाब्दिक चकमक बघायला मिळाली. महापौरांशी असे बोलू नका, मग तुम्ही क्लास घ्या कसे बोलायचे ते अशा सवाल जवाबात महापालिकेची सर्वसाधारण सभा महिला सभासदांनी गाजवली.
२१ जून रोजी महापालिकेच्या विस्तारीत इमारतीच्या उदघाटनाच्या कार्यक्रमात नव्या सभागृहाचे छत गळाले होते. त्यानंतर बांधकाम अपूर्ण असतानाही सत्ताधारी भाजपने उदघाटनाची घाई केली असा आरोप विरोधकांकडून येत आहे.याच विषयावर आज महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेने रेनकोट आंदोलन केले.या विषयावर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत चर्चा करण्यात आली.
ही चर्चा सुरु असताना काही नगरसेवकांची इच्छा असताना वेळेचे महत्व लक्षात घेत प्रातिनिधीक सभासदांचे मनोगत झाल्यावर महापौर मुक्ता टिळक यांनी गटनेत्यांनी नावे पुकारण्यास सुरुवात केली. मात्र त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका अश्विनी कदम यांनी नाराजी व्यक्त करत मला बोलायचे होते सांगून आक्षेप घेतला. मात्र महापौर टिळक यांनी शिवसेना गटनेत्यांना तुम्हाला बोलण्याची संधी दिली आहे सांगत निर्णय घेण्यास सांगितले. त्यानंतर कदम बोलण्यासाठी आक्रमक राहिल्या.आपण आमच्या बोलण्याला घाबरता का असा सवालही त्यांनी विचारला. त्याचवेळी भाजपच्या नगरसेविकांनी तीव्र आक्षेप नोंदवत महापौरांशी या भाषेत बोलणे चुकीचे असल्याचे सांगत तेवढ्याच आवाजात उत्तर दिले. भाजपच्या नगरसेविका वर्षा तापकीर यांनी महापौरांशी अशा आवाजात बोलू नका असे सांगताच कदम यांनी मग तुम्ही क्लास घ्या, आम्ही येतो अशा शब्दात त्यांनी प्रत्युत्तर केले. महिलांच्या या वादामुळे सभागृहात काहीवेळ गोंधळ उडाल्याचे बघायला मिळाले. अखेर कदम यांना बोलण्यास संधी न मिळाल्याने निषेध करून बाहेर पडणे त्यांनी पसंत केले.