इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी आणि भाजपात लढत चुरशीची; मात्र सरशी कुणाची हे 'गुलदस्त्या'तच
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2021 09:26 PM2021-01-18T21:26:54+5:302021-01-18T21:28:17+5:30
दोन्ही पक्षाचा वर्चस्वाचा दावा : सरपंच सोडतीकडे सर्वांचे लक्ष
सागर शिंदे -
इंदापूर : इंदापूर तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूक २०२१ अतिशय चुरशीची झाली यामध्ये इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत व भाजपा पुरस्कृत अनेक पॅनल व स्थानिक आघाडी तसेच सर्वपक्षीय पॅनल यांनी एकूण ६० ग्रामपंचायतीत जोर लावून निवडणूका लढल्या. सोमवार ( दि. १८ ) रोजी या साठही ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ६० पैकी ३७ व ४ ग्रामपंचायती संमिश्र आहेत असे सांगत ३७ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वर्चस्व तालुक्यात निर्माण झाले आहे असे जाहीरपणे सांगितले आणि इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जाहीर प्रसिद्धी पत्रक काढत पत्रकारांना माहिती दिली.
तर भारतीय जनता पार्टीच्या वतीने माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी ६० पैकी ३८ व ४ संमिश्र ग्रामपंचायती आहेत असे सांगत, ३८ ग्रामपंचायतींवर भारतीय जनता पार्टीचे वर्चस्व आहे असे सांगत जाहीरपणे प्रसिद्धी पत्रक काढून माध्यमांना माहिती दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व भारतीय जनता पार्टी यांनी आपापल्या पक्षाच्या वतीने ग्रामपंचातींवर दावा केला आहे. मात्र निवडणूक लढवून निवडून आलेल्या उमेदवारांचे सर्व लक्ष सरपंच आरक्षण सोडतीकडे लागले आहे. आता सरपंच कोणाचा आणि कोणत्या पक्षाचा होणार हे येणार काळ ठरवेल.
इंदापूर शहरातील शासकीय गोडावूनमध्ये निवडणूक निकाल जाहीर करण्यात आले. यावेळी सकाळी १० पासून दुपारी २ वाजेपर्यंत तालुक्यातील साठ ग्रामपंचायतींच्या कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी मोठी गर्दी बाबा चौक कालठण रोड येथे केली होती. विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून जल्लोष केला.
_____________