येरवडा कारागृहात चाललंय काय? कैद्यांमध्ये पाण्यावरून हाणामारी; प्लास्टिकच्या बादलीने मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2023 01:04 PM2023-06-25T13:04:19+5:302023-06-25T13:04:44+5:30
हौदावर पाणी भरण्यावरून त्यांच्यात भांडणे झाल्यावर एका कैद्याने दुसऱ्याला बादलीने मारून जखमी केले
पुणे: एखादा गुन्हा केल्यावर त्याला कैदी म्हणून कारागृहात बंदिस्त केले जाते. त्याठिकाणी शिक्षा भोगून तो बाहेर आल्यावर पुन्हा त्या वाटेवर जाणार नाही. यासाठी त्याला बंदिस्त करण्यात येते. परंतु गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील येरवडा कारागृहात विचित्र घटना घडू लागल्या आहेत. कारागृहात असतानाही चक्क कैदीच एकमेकांशी भांडू लागले आहेत. येरवडा कारागृहात गेल्या आठवड्यात १६ कैद्यांमध्ये मारामारीचा प्रकार घडला असताना गुरुवारी पुन्हा एकदा हौदावर पाणी भरण्यावरून कैद्यांमध्ये हाणामारी झाल्याचे समोर आले आहे.
यात चार कैद्यांनी एका कैद्याच्या पाठीत प्लास्टिकच्या बादलीने मारहाण करून जखमी केले. याबाबत येरवडा पोलिसांनी प्रकाश विठ्ठल रेणुसे, विकास बाळासाहेब कांबळे, वैभव थिटे, तेजस बाळासाहेब बच्चाव या कैद्यांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार येरवडा कारागृहातील सी जे विभागातील हौदाजवळ गुरुवारी सकाळी पावणेनऊ वाजता घडला. या घटनेत सुजित प्रकाश टाक हा कैदी जखमी झाला आहे.
कारागृहातील सी जे विभागात कैद्यांना ठेवण्यात आले आहे. हौदावर पाणी भरण्यावरून त्यांच्यात भांडणे झाली होती. त्या रागातून सुजित टाक हा गुरुवारी सकाळी हौदावर पाणी भरण्यासाठी आला असता चौघांनी त्याला हाताने मारहाण केली. नंतर प्लास्टिकच्या रिकाम्या बादल्यांनीही त्याच्या डोक्यात, कपाळावर, उजव्या डोळ्यावर, पाठीत मारले. त्यात तो जखमी झाला.