लढा कोरोनाशी! नियमित प्राणायमाने संपूर्ण कुटुंबाने कोरोनाला हरवले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 12:52 PM2021-05-17T12:52:10+5:302021-05-17T12:52:16+5:30
नगीमुख कुटुंबातील तिघांनी केली कोरोनावर यशस्वीरित्या मात
मांजरी: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कुटूंबच पूर्णपणे बाधित होऊ लागली आहेत. अनेक कुटुंबात भीतीचे वातावरणही निर्माण झाले आहे. परंतु अशा परिस्थितीत न घाबरता सकारात्मक विचार, योग्य आहार, व्यायाम, प्राणायम, योगासन या सर्व गोष्टींचे उत्तमरीत्या नियोजन केल्यास कोरोनावर यशस्वीरित्या मात करता येते. असेच मांजरी भागातील नगीमुख कुटुंबीयांनी करून दाखवले आहे. ते गेल्या काही वर्षांपासून नियमित प्राणायम आणि योगासन करत असल्यामुळे कोरोनाबाधित झाल्यानंतर मानसिक व शारीरिक संतुलन सांभाळले गेले. यातूनच, एका कुटुंबातील तीन व्यक्तींनी कोरोनावर मात केली.
वडगाव शेरी भागातील नगीमुख या कुटुंबात आई, वडील व मुलगा असे तिघे राहतात. वडील कंपनीत काम करतात. प्रथमतः त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर घरातील इतरांची चाचणी केल्यानंतर आई आणि मुलगा सिद्धांत हे दोघेही कोरोनाबाधित असल्याचे निदर्शनास आले. घरातील सर्वजण कोरोनाबाधित झाल्याने अस्वस्थता वाढली. पण तरीही मन खंबीर करून या संकटास सामोरे जाण्याचा सर्वांनी दृढनिश्चय केला. पहिला आठवडा हा अत्यंत कसोटीचा ठरला. डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार चालू होते. गृहविलगीकरणात गेल्यामुळे अत्यंत मर्यादित विश्वात हे सर्वजण जगत होते.
या काळातच एके दिवशी रात्री १२ च्या सुमारास मुलगा सिद्धांतला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. धापही लागत होती. थोडा वेळ त्रास सहन केला परंतु काही फरक पडत नव्हता. शेवटी नाईलाजाने वडिलांना त्याने झोपेतून उठवले. घराच्या सर्व खिडक्या उघडून हवा खेळती राहील, अशी व्यवस्था केली. वडिलांनी सांगितल्याप्रमाणे, पोटावर झोपूनही श्वास घेण्यासाठीचा त्रास हा काही कमी झाला नाही.
गेल्या काही वर्षांपासून हे कुटुंब सदगुरु श्री जग्गी वासुदेव यांच्या सत्संग शिबिरांशी निगडित आहे. या शिबिरात त्यांनी इनर इंजिनिअरिंगच्या माध्यमातून श्वासासी निगडित अनेक क्रियांचे प्रशिक्षण घेतले होते. सिंहक्रिया, शांभवी महामुद्रा, सुख क्रिया आदींसारख्या श्वसनाच्या व्यायामांनी फुफ्फुसांना ऑक्सिजनचा अधिक पुरवठा होऊन ती अधिक सक्षमपणे काम करतात. यासंबंधीची माहिती त्यांना होती. नकारात्मक विचार मनात येऊ न देता, मन खंबीर करून सिद्धांतने सुखक्रिया करण्यास सुरुवात गेली. हळूहळू अनुकूल परिणाम जाणवू लागले. श्वास घेण्याचा त्रासही कमी होऊ लागला आणि एका तासापर्यंत पूर्णपणे आराम वाटू लागला. पुढील दोन आठवड्यात मात्र कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवला नाही. मानसिक आणि शारीरिक संतुलन करीत, हे कुटुंब सहीसलामत या जीवघेण्या आजारातून बरे झाले.