रस्त्यावर उतरून नव्हे, तर चक्री उपोषणातून लढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 12:30 AM2018-08-19T00:30:40+5:302018-08-19T00:31:17+5:30
मराठा समाजास आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीकरिता आतापर्यंत राज्यभर ५८ मूक मोर्चे काढणाऱ्या सकल मराठा समाजाकडून पुढील काळात लढा सुरू राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मराठा समाजास आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीकरिता आतापर्यंत राज्यभर ५८ मूक मोर्चे काढणाऱ्या सकल मराठा समाजाकडून पुढील काळात लढा सुरू राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. आता रस्त्यावर उतरून नव्हे, तर येत्या २० आॅगस्टपासून पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर (कौन्सिल हॉल) बेमुदत चक्री उपोषणाला बसणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मराठा क्रांती मूक मोर्चा व सकल मराठा समाज यांचे समन्वयक शांताराम कुंजीर यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन मराठा आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली.
औरंगाबाद येथे समन्वयकांच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे सोमवारी (दि. २०) दररोज सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत चक्री उपोषण आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनाच्या काळात आत्महत्या करणाºया आंदोलकांच्या कुटुंबीयांस नुकसानभरपाई मिळावी, शासकीय नोकरी द्यावी, आंदोलकांविरुद्ध दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत, यांसारख्या १५ मागण्यांकरिता बेमुदत चक्री उपोषण करण्यात येणार आहे. मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या आंदोलनाला गालबोट लागल्याने चिंता व्यक्त करण्यात आली.
याविषयी स्पष्टीकरण देताना पदाधिकाºयांनी आंदोलनात बाह्यशक्तींचा शिरकाव झाल्याने शांततेतील मोर्चाला हिंसक वळण लागले आहे. पोलीस प्रशासनाकडून त्याचा तपास होत असून त्यामागील सूत्रधाराचा शोध घेतला जाईल.
आंदोलनादरम्यान जखमी झालेल्या व्यक्तींची काळजी समाजबांधवांकडून घेतली जाणार आहे. येत्या दहा ते बारा दिवसांत औरंगाबाद येथे पुन्हा मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले असून, त्यानंतर आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट करण्यात येईल, असे याप्रसंगी सांगण्यात आले.
गेल्या काही दिवसांत मुंबईसह औरंगाबाद, चाकण, कळंबोली, नवी मुंबई आदी परिसरात जाणीवपूर्वक दंगली घडविण्यात आल्या असून त्यात कोण सहभागी होते, याचा शोध घेण्याची गरज आहे. मात्र याविषयी शासनाची गुप्तचर यंत्रणेला अपयश आले आहे, अशी टीका समितीच्या वतीने करण्यात आली.
या पत्रकार परिषदेला मराठा क्रांती मूक मोर्चा व सकल मराठा समाजाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे, तुषार काकडे, धनंजय जाधव, हनमंत मोटे, किशोर मोरे, विराज तावरे, प्रशांत धुमाळ, सचिन आडेकर, युवराज दिसले, गणेश मापारी, मीना जाधव उपस्थित होते.
आचारसंहितेचे फलक उभारणार
आंदोलनात सहभागी होणाºयांसाठी आचारसंहिता तयार करण्यात आली असून, यात आंदोलनादरम्यान शांतता बाळगावी, कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा, आंदोलनाला कुठल्याही प्रकारे गालबोट लागेल अशा प्रकारची कृती करू नये, कुठल्याही राजकीय पक्ष, संघटना यांचा सहभाग मोर्चात असणार नाही, याशिवाय मोर्चादरम्यान रस्त्यावर पडलेल्या पाण्याच्या बाटल्या यांची योग्य विल्हेवाट लावावी, आदी सूचनांचा समावेश असून, शहरभरात त्याचे मोठे फलक लावण्यात येणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.