कामगारांच्या हितासाठी लढू - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2018 12:36 AM2018-07-09T00:36:20+5:302018-07-09T00:36:41+5:30

जर देशाचे हित जोपासायचे असेल तर कष्टकरी कामगार वर्गाचे हित जपण्याची गरज आहे. या कामगारांच्या हितासाठी आपण कामगारांच्या पाठिशी राहु,’’ अशी ग्वाही माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी दिली.

 Fight for the welfare of workers - Sharad Pawar | कामगारांच्या हितासाठी लढू - शरद पवार

कामगारांच्या हितासाठी लढू - शरद पवार

Next

कोरेगाव भीमा - ‘‘देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात ज्या कामगारांनी आपली प्राणाची आहुती दिली त्याच देशात कामगार व त्याच्या कुटुंबाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. देशात ४ कोटी ५२ लाख तरुण बेकार आहेत अशा परिस्थितीत जर देशाचे हित जोपासायचे असेल तर कष्टकरी कामगार वर्गाचे हित जपण्याची गरज आहे. या कामगारांच्या हितासाठी आपण कामगारांच्या पाठिशी राहु,’’ अशी ग्वाही माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी दिली.
कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघांच्या वतीने आयोजित केलेल्या कामगार मेळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी माजी आमदार अशोक पवार, पोपटराव गावडे, सुर्यकांत पलांडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदिप कंद, कामगार आयुक्त लाकसवार, कुसूम मांढरे, मोनिका हरगुडे तसेच महासंघांचे अध्यक्ष किशोर ढोकले, शिवाजीराव खटकाळे, दत्तात्रय येळवंडे, राजेंद्र दरेकर, रमेश सातपुते, सरचिटणीस अविनाश वाडेकर, गणेश जाधव, आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम छत्रपती शिवराय व कामगारांचे संघटन करणारे नारायणराव लोखंडे यांच्या प्रतिमापुजन करून शरद पवार यांना महात्मा फुलेंची पगडी घालून सन्मानित केले.
पवार म्हणाले, महाराष्ट्रासह देशाच्या जडणघडणीत कामगारांचा मोठा वाटा असल्याने पूर्वी कष्टकरी कामगारांच्या सामुहिक शक्तीवर देशाची धोरणे ठरत होती. आता मात्र बदललेल्या परिस्थितीमुळे कामगार संघटनांची ताकद पूर्वीसारखी राहिली नाही. त्यात कामगार कायद्यांमध्ये मोठा बदल केल्याने देशात ४ कोटी ५२ लाख तरुण कामगार बेकार झाले आहेत. अशा परिस्थितीत कामगारांचा सन्मान व अधिकार जपण्यासाठी महासंघ करीत असलेले संघटन कार्य कौतुकास्पद आहे. किशोर ढोकले म्हणाले, देशात उद्योगपतींना केंद्रबिंदु मानुन धोरण आखली जात असल्याने कामगार व शेतक-यांवर मोठा अन्याय होत आहे. शेतक-यांप्रमाणेच कामगारही आर्थिक विवंचनेत आता आत्महत्या करु लागला आहे. जगात सर्वात जास्त तरुण बेकार अससणारा देश म्हणुन भारताची ओळख निर्माण झाली आहे. सरकारच्या धोरणामुळे कामगार देशोधडीला लागला आहे.

कार्याध्यक्ष शिवाजीराव खटकाळे यांनी कंत्राटीकरण, ग्रॅज्युईटी, औद्योगिक सुरक्षा, आरोग्य, कामगारांचे हक्क यासह विविध प्रश्न मांडत सामान्यांची दु:खे जाणणारे व्यापक नेतृत्व असलेले शरद पवार यांनी कामगार हिताचे निर्णय व्हावेत, यासाठी लक्ष घालण्याची विनंती केली.

Web Title:  Fight for the welfare of workers - Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.