लढाऊ विमानांची होणार आता निर्धोक भरारी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 12:50 AM2017-09-02T00:50:23+5:302017-09-02T00:51:12+5:30
लढाऊ विमाने उडवण्यासाठी वैमानिकांकडे अतिउच्च कौशल्याची गरज असते. अनेकदा तांत्रिक कारणांमुळे तसेच मानवीय चुकांमुळे विमानांचे अपघात होतात.
निनाद देशमुख
पुणे : लढाऊ विमाने उडवण्यासाठी वैमानिकांकडे अतिउच्च कौशल्याची गरज असते. अनेकदा तांत्रिक कारणांमुळे तसेच मानवीय चुकांमुळे विमानांचे अपघात होतात. भविष्यातील असे अपघात टाळण्यासाठी तसेच वैमानिकांचा थकवा तसेच तणाव कमी करून त्यांच्या क्षमतांचा विकास करण्यासाठी डीआरडीओच्या सहकार्याने नव्या यंत्रणेचा विकास करण्यात येत आहे. यामुळे भविष्यात भारतीय हवाई दलातील वैमानिक कठीण परिस्थीतही चांगली कामगिरी करू शकणार आहेत, अशी माहिती हवाई दलाच्या आरोग्य विभागाचे प्रमुख एअर मार्शल पवन कुमार यांनी दिली.
लढाऊ विमाने उडवण्यासाठी अनेक कसोट्यांना वैमानिक पुढे जात असतात. तासन्तास विमानाचे उड्डाण करताना तणाव, थकवा तसेच अनेक मानसिक आव्हानांचा सामना वैमानिकांना करावा लागतो. या परिस्थितीत चुका होऊन अपघात होण्याची शक्यता असते. यामुळे वैमानिकांवरील तणाव कमी असणे गरजेचे असते. यासाठी डीआरडीओच्या साह्याने नवी यंत्रणा विकसित करण्यात येत असून वैमानिकांवर याचे काय परिणाम होतात, याच्या चाचण्या सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
सध्या, उड्डाणापूर्वी वैमानिकाच्या पूर्व-वैद्यकीय चाचण्या वायुसेनेतर्फे घेतल्या जातात. वैमानिकांसाठी तयार करण्यात येणारी नवी यंत्रणा ही सध्यस्थितीत असलेल्या यंत्रणेपेक्षा अधिक प्रभावी आहे. ही यंत्रणा अधिक वस्तूनिष्ठ आहे. वैद्यकीय अधिकाºयांच्या तपासणीत न आढळलेल्या गोष्टी या यंत्रणेद्वारे माहिती करणे शक्य होणार आहे. वैमानिकांच्या डोळ्यांच्या हालचाली, शारीरिक हालचाली, त्याची मानसिक स्थिती अभ्यासता येणार आहे. ही यंत्रणा हाताळण्यास अधिक सोपी असणार असल्याचेही त्यांनी सांगितले. परदेशात वैमानिकांना येणाºया अडचणी तपासण्यासाठी आधुनिक यंत्रणांचा विकास झाला आहे. भारतातही या सारख्या यंत्रणेची गरज होती. या नव्या यंत्रणेमुळे वैमानिकांना अधिक सक्षम बनवता येणार आहे.
वैमानिकांना अनावर होणारी झोप यावर संशोधन सुरू आहे. यासाठी ४० वैमानिकांची चाचणी घेण्यात आली होती. यात अनेक तथ्ये पुढे आल्याची माहिती सूत्रांनी दिली. लांब पल्यांच्या उड्डाणावेळी सतर्क राहण्यासाठी तसेच झोप टाळण्यासाठी वैमानिकांद्वारे काही औषधांचे सेवन करण्यात येते. यामुळे अल्पझोपेच्या तक्रारीवर मात करता येते. लढाऊ विमान चालवतांना वैमानिकाला सतर्क राहावे लागते. एक छोटीशी चूक अपघातासाठी कारणीभूत ठरू शकते.
एका विमानाची किंमत कोट्यवधी रुपयांमध्ये असते. त्यामुळे हवाई दलाला असे अपघात परवडणारे नसतात.
अशा प्रकारच्या यंत्रणेमुळे वैमानिकाचा थकवा तसेच तणाव कमी करता येईल, आणि मानवी चुका टाळता येतील, असे नाव न छापण्याच्या अटीवर एका वैमानिकाने सांगितले.